केरळमधील बनावट नोटांच्या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मल्याळम टीव्ही अभिनेत्रीला अटक केली आहे. ५७ लाख रुपयांच्या बनावट नोटांच्या रॅकेटप्रकरणी ही अटक झाली असून अभिनेत्रीच्या घरातच या नोटा छापल्या जात होत्या.

मल्याळम अभिनेत्री सुर्या शशीकुमारचे (वय ३६) कोल्लम येथे घर आहे. निवासस्थानावरील पहिला मजला सुर्याने बनावट नोटा छापण्यासाठी दिला होता. रॅकेटच्या सूत्रधारांनी या मोबदल्यात तिला नफ्यातून काही वाटा देण्याची तयारी दर्शवली होती. तिच्या घराच्या पहिल्या मजल्यावर बनावट नोटा छापण्याचे काम चालायचे. नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य विकत घेण्यासाठी तिने ४ लाख ३६ हजार रुपये खर्च केले होते. हा प्रकार पोलिसांना समजताच पोलिसांनी सुर्यासह तिची बहीण श्रृती (वय २९) आणि आई रमादेवी (वय ५६) या दोघांनाही अटक केली. अभिनेत्रीच्या घरातून बनावट नोटा आणि त्या छापण्यासाठी वापरले जाणारे कॉम्प्यूटर, प्रिंटर, शाई, रिझर्व्ह बँकेचे खोटे शिक्के आणी सील जप्त करण्यात आले आहे. तिच्या घरात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जात होत्या. अभिनेत्रीची आई या रॅकेटमध्ये सक्रीय होती आणि तिच्या मुली या कामात तिला मदत करायच्या.

जवळपास सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा तिच्या घरी छापल्या जाणार होत्या, अशी माहिती पोलीस तपासात समोर आले आहे. केरळमध्ये बनावट नोटांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली असून दोन दिवसांपूर्वी अन्नाकडई भागातून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात लष्करातील निवृत्त सैनिकाला अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून या तिघींची नावे उघड झाली होती.