लॉकडाउनच्या या दिवसांमध्ये माणूसकीची अनेक उदहारणे समोर येत आहेत. पोलीस, वैद्यकीय सेवा क्षेत्रातील कर्मचारी स्वत:पुरता विचार न करता जोखीम पत्करुन दुसऱ्याची मदत करत आहेत. केरळमध्ये असेच एक मन हेलावून टाकणारे प्रकरण समोर आले आहे. एका वैद्यकीय सार्जंटने चारवर्षाच्या मुलीला वेळेवर औषधे पोहोचवण्यासाठी बाईकवरुन तब्बल १५० किलोमीटरचा प्रवास केला. या मुलीचा कॅन्सरशी लढा सुरु आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

ही मुलगी अलप्पुझा जिल्ह्यामध्ये राहते. दर महिन्याला केमोथेरपीसाठी ती तिरुअनंतपूरम येथील कॅन्सर सेंटर येथे येते. करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने कॅन्सर सेंटर बंद होते. त्यामुळे डॉक्टरांनी मुलीच्या पालकांना तिला तात्पुरती घरातच औषधे देऊन तिथेच थांबण्याचा सल्ला दिला. अलप्पुझा जिल्ह्यामध्ये कॅन्सरची ती औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे मुलीच्या पालकांनी अँटनी रथीश या पोलीस अधिकाऱ्याकडे मदत मागितली.

रथीश यांनी त्यांचा मित्र विष्णूला फोन केला. माजी पोलीस अधिकारी असलेला विष्णू तिरुअनंतपूरम मेडीकल कॉलेजमध्ये मेडीकल सार्जंट आहे. रथीश यांनी विष्णूला तिरुअनंतपूरमच्या कॅन्सर सेंटरमधून औषधे उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. “विष्णू ड्युटीवर जाण्यासाठी अलप्पुझा येथून तिरुअनंतपूरमला निघणार होता. तो तिरुअनंतपूरम येथेच आठवडाभर थांबणार होता. मी त्याला परिस्थिती समजावल्यानंतर तो मदत करायला तयार झाला” असे रथीश यांनी सांगितले.

आणखी वाचा- लष्करात अधिकारी असलेल्या मुलाचा मृत्यू, अंत्यसंस्कारासाठी आई-वडिलांचा रस्त्याने २००० किमीचा प्रवास

विष्णूने प्रिस्क्रिप्शन घेतले व २९ मार्चला तो निघाला अशी माहिती रथीश यांनी दिली. विष्णूकडे जुन्या औषधाचे प्रिस्क्रिप्शन होते. त्याचा उपयोग नव्हता. पण डॉक्टरला पेशंटबद्दल सर्व माहिती होती. त्या मुलीला वेगळया औषधांची आवश्यकता होती. मुलीला ज्या औषधांची गरज होती ती औषधे विष्णूने औषधालयातून घेतली. पण या सर्वामध्ये एक आव्हान होते. त्या मुलीला संध्याकाळी सहावाजेपर्यंत ती औषधे मिळणे आवश्यक होते.

विष्णूने आधी कोल्लमपर्यंत औषधे पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. पण तो प्लान यशस्वी झाला नाही. मग त्याने स्वत:च अलप्पुझा येथे जाऊन ती औषधे देण्याचा निर्णय घेतला. त्याने संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी ती औषधे त्या मुलीच्या पालकांच्या हाती दिली अशी माहिती अँटनी रथीश यांनी दिली.

आणखी वाचा- पोलिसांच्या सुरक्षेत भाजपा आमदाराचं जंगी बर्थडे सेलिब्रेशन, गर्दीला समजावलं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व

वेळेमध्ये त्या मुलीला औषधे मिळावीत यासाठी विष्णूने स्वत: धोका पत्करला. ही एक प्रकारची रिस्कची होती. त्याने अत्यंत कमी वेळात बाईकवरुन १५० किलोमीटर अंतर कापून औषधे पोहोचवली. “कॅन्सरशी लढा देणाऱ्या या मुलीचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. उपचाराचा खर्च भागवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागतेय” असे रथीश यांनी सांगितले.