टोल नाक्यावर अनेकदा सर्वसामान्यांना वाहनांच्या गर्दीमुळे तिष्ठत रहावे लागते. अशावेळी सर्वसामान्य नागरिक कितीही कंटाळा आला तरी निमूटपणे नियमांचे पालन करतात. पण केरळमध्ये पी.सी.जॉर्ज या अपक्ष आमदाराला टोल नाक्यावर थोडा जास्तवेळ थांबणे अजिबात सहन झाले नाही. या आमदार महोदयांचा पारा चढला व त्यांनी स्वत:हा गाडीतून उतरुन स्वयंचलित बॅरिकेड तोडून टाकले. थ्रिसूरमधील ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

जॉर्ज स्वत:हाच्या आलिशान गाडीतून उतरले व बॅरिकेडच्या दिशेने चालत गेले. त्यांचा गाडीतील सहकारी व ड्रायव्हरने सुद्धा हा बॅरिकेड तोडण्यासाठी त्यांची मदत केली. फुटेजमध्ये जॉर्ज टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. बॅरिकेड तोडून रस्ता मोकळा केल्यानंतर जॉर्ज यांची गाडी निघून गेली. जॉर्ज यांच्या गाडीला टोल नाक्यावर थोडा वेळ थांबून रहावे लागल्यामुळे त्यांचा पारा चढला.

मला ट्रेन पकडायची होती. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने माझ्या गाडीवर आमदाराचा स्टीकर असल्याचे पाहिले तरी त्याने गाडी थांबवली. आम्ही थांबलो होतो पण त्याने आमच्याकडे पाहिले सुद्धा नाही. आमच्या मागे ज्या गाडया उभ्या होत्या त्या हॉर्न वाजवत होत्या. मी काही वेळ थांबलो होतो पण माझ्यासमोर नंतर पर्याय नव्हता म्हणून मी बॅरिकेड तोडला असे जॉर्ज यांनी सांगितले.