खिल्ली उडवणाऱ्या १४ वर्षांच्या मुलाची आईने हत्या केल्याची घटना केरळमध्ये घडली. पोलिसांनी जया जॉब या महिलेला अटक केली असून तिचे मानसिक संतुलन ढासळले होते, असे सांगितले जाते. मुलाची हत्या केल्यानंतर जया जॉबने त्याचा मृतदेहदेखील जाळला होता. या प्रकरणाने परिसरात संतापाची लाट उसळली असून संतप्त महिलांनी जयाला मारहाणीचा प्रयत्न देखील केला.

कोल्लम येथे राहणारा १४ वर्षांचा जितू जॉब नववी इयत्तेत शिकत होता. जितूचे वडील हे मेडिकल दुकानात कामाला असून त्याची आई जया ही गृहिणी आहे. सोमवारी रात्री जितूचे वडील कामावरुन घरी परतले. जितूबाबत त्यांनी पत्नी जयाकडे विचारणा केली. जितू दुपारपासून घरी परतलाच नाही, असे जयाने सांगितले. यानंतर त्याच्या वडिलांनी स्थानिकांच्या मदतीने मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. शेवटी मंगळवारी सकाळी त्यांनी पोलिसांकडे मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे तक्रार दाखल करण्यासाठी जयादेखील पतीसोबत पोलीस ठाण्यात गेली होती.

बुधवारी घरापासून काही अंतरावर निर्जनस्थळी जितूचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. जितूची आई जयाने पतीला दिलेली माहिती आणि पोलिसांना दिलेली माहिती यात तफावत होती. तसेच जयाच्या हातावरील भाजल्याचे डाग दिसत होते. त्यामुळे पोलिसांना जयावर संशय आला. गुरुवारी सकाळी पोलिसांनी जयाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता जयाने गुन्ह्याची कबुली दिली. मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर जयाने त्याचे हात पाय तोडले. यानंतर त्याचा मृतदेह शालीत गुंडाळला आणि घरापासून काही अंतरावर नेऊन जाळला. घरातील रक्ताचे डागही तिने पुसले होते.

जयाचे मानसिक संतुलन ढासळल्याचा दावा तिच्या पतीने केला आहे. जितूने यावरुनच जयाची खिल्ली उडवली आणि यावरुन झालेल्या वादात तिने मुलाची हत्या केली, असा संशय आहे. यापूर्वीही माता-पुत्रात वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या गुन्ह्यात जयाला आणखी कोणी मदत केली होती का याचा देखील तपास सुरु आहे. गुरुवारी मुलाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जयाला घरी नेण्यात आले. यादरम्यान संतप्त महिलांनी तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.