केरळमधील नन बलात्कार प्रकरणातील आरोपी जालंधर येथील बिशप फ्रँको मुलक्कल यांची व्हॅटिकनने अखेर गुरुवारी (दि. २०) प्रमुखपदावरुन हाकालपट्टी केली. मुलक्कलविरोधात बलात्कार प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर तसेच चहुबाजूकडून टीका झाल्यानंतर व्हॅटिकनला हा निर्णय घेणे भाग पडले. गुरुवारी पुन्हा मुलक्कल केरळ पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहिले. बुधवारीही पोलिसांनी सुमारे सहा तास त्याची चौकशी केली होती.


दरम्यान, बिशम फ्रँको मुलक्कल यांनी व्हॅटिकनकडे आपल्याला जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांनी पोप फ्रान्सिस यांना पत्र लिहून काही काळासाठी पदमुक्त करण्याची परवानगी मागितली होती. यामागे त्यांनी खटल्याचा हवाला दिला होता. त्यांनी पत्रात लिहीले होते की, आपल्याविरोधात काही आरोपांची चौकशी सुरु आहे, पोलिसांच्या या चौकशीला सहकार्य देण्यासाठी आपल्याला पदमुक्त करण्यात यावे.


बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर २०१४ पासून २०१६ दरम्यान एका ननवर बलात्कार आणि तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यापूर्वी बिशप मुलक्कलने एक निवदेन जारी करीत प्रशासकीय जबाबदारी दुसऱ्या धर्मगुरुंकडे सोपवली होती. दरम्यान, मुलक्कल यांच्या अटकेची मागणी गुरुवारी १३ दिवशीही सुरुच होती. उपोषणाला बसलेल्या पीडितेच्या एका बहिणीला प्रकृती खालावल्याने तिला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बिशपच्या अटकेसाठी पोलीस महानिरिक्षकांच्या कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आला होता.