निपाह व्हायरसमुळे मरण पावलेल्या केरळमधील नर्स लिनी पुथूसेरी यांच्या कुटुंबाला केरळ सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करताना लिनी यांना या व्हायरसचा संसर्ग झाला. केरळ सरकारने लिनी यांच्या कुटुंबाला २० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून त्यांच्या नवऱ्याला साजीशला सरकारी नोकरी देण्याची तयारी दाखवली आहे. केरळमध्ये निपाहमुळे मरण पावलेल्या अन्य रुग्णांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. केरळमध्ये निपाहने दहशत निर्माण केली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

आपलं कर्तव्य निभावातांना जीवाचीही पर्वा न करणाऱ्या लिनी यांचं देशभरात कौतुक केलं जात आहे. निपाह व्हायरस झालेल्या रुग्णावर उपचार करताना लिनी यांनाही त्याची लागण झाली. आपला मृत्यू जवळ आला आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अजून एक मोठा त्याग केला. लिनी यांनी आपल्या पतीला पत्र लिहून, अखेरच्या दिवसांत मुलांसहित संपूर्ण कुटुंबाला दूर राहण्याची विनंती केली, जेणेकरुन त्यांना या भयंकर रोगाची लागण होऊ नये.

“आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये लिनी यांना कळलं होतं की, आपण धोकादायक निपाह व्हायरसच्या विळख्यात अडकलो आहोत. तिने निपाह व्हायरसची लागण झालेल्या एका रुग्णावर उपचार केले होते, ज्याचा नंतर मृत्यू झाला. लिनी नेहमीच दुसऱ्यांना मदत करत असे आणि जातानाही ती मोठा त्याग करुन गेली”, असं लिनी यांच्या मामी व्ही बालन यांनी सांगितलं आहे.

“मला नाही वाटत की आता मी तुम्हाला भेटू शकेन. आपल्या मुलांचा व्यवस्थित सांभाळ करा. त्यांना आपल्यासोबत परदेशात घेऊन जा. माझ्या वडिलांप्रमाणे अजिबात एकटे राहू नका”. असे भावनिक पत्र नर्स लिनी यांनी त्यांच्या पतीला लिहीले होते.