केरळमधील कोल्लम येथे जुना लोखंडी पादचारी पूल कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत ५७ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर कालव्यात बुडून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे.

कोल्लम येथील चवारा येथे कालव्यावर जुना लोखंडी पादचारी पूल होता. केरळ मिनरल्स अँड मेटल्स लिमिटेड या कंपनीच्या आवारात हा पूल होता. सोमवारी सकाळी हा पूल कोसळला असून दुर्घटनेच्या वेळी सुमारे ७० कामगार पुलावर होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर कामगार कालव्यात बुडून बेपत्ता झाले का, याचादेखील शोध सुरु आहे. लोखंडी पुलाची अवस्था धोकादायक होती, असे सांगितले जाते. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.