अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्याविरोधात केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने त्यांच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. २०१३मध्ये हे प्रकरण घडल्याचा दावा संबंधीत महिलेने केला आहे.

द हिंदूच्या वृत्तानुसार, पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपल्या व्यवसायाला फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने चंडी यांनी आपल्यावर अत्याचार केला. सौर ऊर्जा प्रकल्प गुंतवणूकप्रकरणी फसवणुकीचा आरोप असलेल्या महिलेने थिरुवअनंतपुरम येथील मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी क्लिफ हाऊस येथे हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे.

थिरुवअनंतपुरमच्या स्थानिक कोर्टात गुन्हे शाखेने शनिवारी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री चंडी यांनी संबंधीत महिलेसोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला आहे. महिलेच्या व्यावसायाला फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने हे कृत्य करण्यात आल्याचे यात म्हटले आहे. मात्र, ही एफआयआर अद्याप गोपनीय ठेवण्यात आली आहे.

पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिने मुख्यमंत्री चंडी यांची खासगी भेट घेतली होती. कारण, तिला आपल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला राजकीय संरक्षण हवे होते. त्यामुळे खासगी गुंतवणूकदार तिच्या प्रकल्पाकडे आकर्षित होतील. मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी काही लोकांनी तिची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली होती.

दरम्यान, शिवरंजन आयोगाने नुकतेच केरळच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या सोलर घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या चौकशीदरम्यान २०१७मध्ये आयोगासमोर ही लैंगिक शोषणाची बाब स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेच्या आरोपांनुसार तिचे शोषण करणाऱ्या सर्व लोकांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी २६ सप्टेंबर रोजी शिवरंजन आयोगाचा १०७३ पानी अहवाल विधानसभेच्या विशेष सत्रात सभागृहासमोर ठेवला होता. यावेळी विजयन यांनी संबंधीत सर्व आरोपींवर खटले दाखल करण्याचे आदेश दिले होते. पीडित महिलेने युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्या जवळपास सर्व मोठ्या नेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.