04 March 2021

News Flash

बाललैंगिक शोषणाविरुद्ध बोलणाऱ्या पास्टरने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सेंट सिबेस्टियन चर्चमध्ये धर्मगुरूचे काम करणाऱ्या फादर रॉबिनने केले हे कृत्य

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

बाललैंगिक शोषणा विरोधात भाषण करणाऱ्या धर्मगुरूनेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली आणि तिने बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे केरळमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित धर्मगुरूस चर्चच्या सर्व पदांवरुन काढून टाकण्यात आले आहे.

मुलीवर बलात्कार झाल्यानंतर ती गरोदर राहिली. धर्मगुरुने तिला एका खासगी रुग्णालयामध्ये  दाखल केले. तिथे तिने एका बाळाला जन्म दिला. ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस असे तिला आणि तिच्या कुटुंबियांना धमकवल्यामुळे ती मुलगी इतके दिवस चूप होती. परंतु, धाडस करुन तिने ही बाब पोलिसांना सांगितली. त्यानंतर धर्मगुरूला अटक करण्यात आली.

फादर रॉबिन वड्डाकुमचिरिल हे कोट्टियूर येथील सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये धर्मगुरू आहेत. चर्चने उपलब्ध करुन दिलेल्या कॉम्प्युटर क्लासमध्ये त्यांनी १७ वर्षीय मुलीचे शोषण केले होते असे पोलिसांनी सांगितले. यामुळे ती गरोदर राहिली. तिला नंतर रुग्णालयात गुपचूपपणे दाखल करण्यात आले. ती गरीब कुटुंबातील असल्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबियांना फादरने पैसेही देऊ केले. या घटनेनंतर फादर रॉबिन पळून जाण्याच्या तयारीत होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

ज्या ठिकाणी मुलीने बाळाला जन्म दिला आहे, त्या रुग्णालयावरही गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ज्यावेळी त्या मुलीला या रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचवेळी ही बाब पोलिसांच्या कानावर त्यांनी घालणे अपेक्षित होते परंतु त्यांनी हे केले नाही असे पोलिसांनी म्हटले. ही बाब पोलिसांना सांगू नका असा त्यांच्यावर  दबाव तर टाकला गेला नाही ना याची तपासणी करण्यात येणार आहे.

धर्मगुरूच्या या कृत्यानंतर त्यांना चर्चच्या सर्व महत्त्वपूर्ण पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. फादर रॉबिनवर भारतीय दंडविधानाच्या बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याअंतर्गत योग्य ती कलमे लावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. फादर रॉबिनची डीएनए चाचणी घेण्यात येणार आहे. एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फादर रॉबिनला बोलवण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी बाललैंगिक शोषण विरोधामध्ये भाषण केले होते. सध्या त्या मुलीच्या बाळाला एका अनाथालयाकडे सोपवण्यात आले आहे. तर, त्या मुलीवर मानसिक आघात झाला आहे असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 5:57 pm

Web Title: kerala priest prevention of children from sexual offences act father robin
Next Stories
1 महात्मा गांधींच्या हत्येनंतर कुणी जल्लोष केला होता?; सीताराम येचुरी
2 १७ एप्रिलपर्यंत पाच हजार कोटी भरा, सुप्रीम कोर्टाचे ‘सहारा’ला आदेश
3 ‘विसरभोळ्या’ इंजिनीअरच्या चुकीमुळे एअर इंडियाचे विमान उतरवले
Just Now!
X