X
X

Sabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले

केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून तृप्ती देसाईंनी मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी विनंती केली आहे.

शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी भुमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई या केरळमध्ये पोहोचल्या आहेत. मात्र, येथील विमानतळावर आगमन होताच त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. महिलांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केल्याने तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच थांबावे लागलेय. आता त्या विमानतळावरुन कधी बाहेर पडणार आणि त्या मंदिरात प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेश नाकारल्याने तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. गुरुवारी त्यांनी मंदिर प्रवेशाचा आपला मानस बोलून दाखवला होता. त्यासाठी त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहीले होते. तसेच मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी केली होती.

शबरीमला मंदिराचे दरवाजे पुन्हा खोलण्यात येणार असल्याने उद्या, शनिवारी तृप्ती देसाई मंदिर प्रवेशासाठी संबंधीत ठिकाणी दाखल होणार आहेत. मात्र, यापूर्वीच हिंदुत्ववादी गटांकडून भाजपा आणि स्थानिक लोकांकडून सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावत महिलांच्या मंदिर प्रवेशावर आक्षेप घेतला आहे.

सुप्रीम कोर्टाने मंदिरात जाण्यापासून महिलांना रोखता येणार नाही असे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक पुरोगामी महिलांनी केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. केरळ सरकारही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करीत महिलांना संरक्षण पुरवत आहे. मात्र, परंपरांवर आघात असल्याचे सांगत भाजपा, हिंदुत्ववादी गट आणि स्थानिक लोकांनी महिलांच्या प्रवेशाला विरोध केला असून गेल्या दोन महिन्यांत येथे अनेक हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाईंनी आता मंदिर प्रवेशाचा आग्रह धरला आहे.

20
First Published on: November 16, 2018 6:14 am
Just Now!
X