सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी खुले केले आहेत. पण न्यायालयाच्या या निर्णयाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. शबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर सामूहिक आत्महत्या करु अशी धमकी केरळ शिवसेनेने दिली आहे. येत्या १७ आणि १८ ऑक्टोंबरला आमच्या महिला शिवसैनिक पांबा नदी किनारी विरोध प्रदर्शन करण्यासाठी जमा होतील.

कुठल्याही महिलेने शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या महिला कार्यकर्त्या सामूहिक आत्महत्या करतील असे केरळ शिवसेनेचे नेते पेरिंगमला अजी यांनी सांगितले. केरळच्या सुप्रसिद्ध शबरीमला मंदिराचे दरवाजे सुप्रीम कोर्टाने महिलांसाठी खुले केल्यानंतर, या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.

नॅशनल अय्यप्पा डिव्होटीज असोसिएशनच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली असून सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय विकृत नसला तरी अस्वीकारार्ह व अयोग्य असल्याची तक्रार करण्यात आली आहे. केरळमधील शबरीमाला येथील अयप्पा मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवल्यानंतर केरळमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यभरातून यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असतानाच आज कोल्लम तुलसी या ज्येष्ठ अभिनेत्याने शबरीमाला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करायला हवे असे धक्कादायक मत व्यक्त केले आहे.

सुप्रीम कोर्टाने २८ सप्टेंबर रोजी अय्यप्पा मंदिरात दहा ते ५० या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी रद्दबातल ठरवली. शारीरिक रचनाभिन्नतेच्या मुद्दय़ावर महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि राज्यघटनेशी विसंगत असलेल्या कोणत्याही प्रथेचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले होते. १८ ऑक्टोबरपासून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.