कठुआ बलात्कारप्रकरणात चित्र रेखाटणाऱ्या केरळमधील एका तरुणीच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. दुर्गा मालती असे तरुणीचे नाव असून कठुआ प्रकरणावरील चित्र सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तिला जिवे ठार मारण्याच्या धमक्या देखील येत आहेत.

दुर्गा मालती ही केरळमधील चित्रकार असून कठुआ बलात्कार प्रकरणावर तिने काही चित्रं काढली होती. हिंदुत्ववाद आणि हिंदू धर्माच्या प्रतिकांचं चित्रण केल्याने तिच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. तिच्या एका चित्रात त्रिशूळावर पुरूषांचे गुप्तांग दाखवण्यात आले होते. तिने ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मावरही काही चित्र रेखाटली आहेत.  तिच्या या चित्रांवरुन वाद निर्माण झाला आहे. दुर्गा मालतीने हिंदू धर्माचा अपमान केला असून तिने हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. गुरुवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी तिच्या घरावर दगडफेक केली. दुर्गा मालतीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन या बाबतची माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर चित्र व्हायरल झाल्यानंतर दुर्गा मालतीला धमक्या येत आहेत.’मला काहींनी जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. मी काढलेले चित्र हे कोणत्याही धर्माविरोधात नाही. भारतात लोकशाही असून मला देखील कलेच्या माध्यमातून माझे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली. माझा जन्म हिंदू कुटुंबात झाला आहे. पण प्रत्येक हिंदू हा संघाचा समर्थक नसतो. हिंदू हा हिंदूच असतो, असे सांगत तिने हिंदूत्ववादी संघटनांना प्रत्युत्तर दिले आहे.