मृतांची संख्या  १०९

केरळमधील कोल्लम जिल्ह्यात पुित्तगल देवी मंदिरात रविवारी फटाक्यांच्या आतषबाजीनंतर लागलेल्या आगीत मरण पावलेल्यांची संख्या १०९ झाली असून मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आतषबाजी कंत्राटदाराच्या सहायकांचाही समावेश असून त्यांच्यावर खून व इतर आरोप ठेवण्यात आले आहेत.

पाच जणांना जाबजबाबासाठी ताब्यात घेतले असून गुन्हे कुणावर दाखल केले व कुणाला ताब्यात घेतले त्यांची नावे पोलिसांनी उघड केलेली नाहीत. कलम ३०७  (खुनाचा प्रयत्न), कलम ३०८ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) व स्फोटक पदार्थ कायदा कलम चार अन्वये गुन्हे दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हे अन्वेषण शाखेने चौकशी सुरू केली असून मंदिर संकुलातून पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली आहे, असे गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एस.अनंतकृष्णन यांनी सांगितले.   आरोपींमध्ये आतषबाजी कंत्राटदारांचे सहायक सुरेंद्रन व कृष्णकुट्टी यांचा समावेश आहे. त्यांनी परावूर या निम्न शहरी भागात असलेल्या देवीच्या मंदिरात आतषबाजी केली होती.

दरम्यान, तिरूअनंतपुरम येथे रूग्णालयात दाखल केलेल्या आणखी तीन जणांचा मृत्यू झाला असून एकूण संख्या १०९  झाली आहे.  ३८३ जखमींवर कोल्लम व राज्याच्या इतर भागातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सरकारी वैद्यकीय पथकांनी विविध रूग्णालयांना भेटी दिल्या असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शंभर वष्रे जुन्या असलेल्या पुित्तगल देवीच्या मंदिरात रविवारी पहाटे साडेतीना वाजता आतषबाजीच्या वेळी ठिणग्या गोदामावर पडून भीषण आग लागली होती.

राज्य सरकारने या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे अन्वेषण खातेही चौकशी करीत आहे. आतषबाजी पाहण्यासाठी हजारो लोक मंदिराच्या परिसरात जमले असताना ही घटना घडली होती.

मंदिर व्यवस्थापन मंडळांचा आतषबाजीवर पूर्ण बंदी घालण्यास विरोध

तिरूअनंतपुरम- केरळमध्ये मंदिरांमध्ये आतषबाजी करण्याची प्रथाच असून पुत्तिंगल मंदिरातील घटनेनंतरही त्रावणकोर देवासम मंडळ या मंदिरांचे नियंत्रण करणाऱ्या संस्थेने आतषबाजीवर पूर्ण बंदी घालण्यास विरोध केला आहे. राज्यातील १२५५ मंदिरे या मंडळाच्या अखत्यारीत आहेत. या मंडळाने सांगितले, की आतषबाजीवर पूर्ण बंदी घालणे आम्हाला अमान्य आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी मंदिरा उत्सवांमध्ये आतषबाजीची प्रथाच असून त्याला बंदी घालण्यास विरोध केला आहे. मंडळाने एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे, की यापुढे मंदिरांमध्ये आतषबाजी करायला हरकत नाही पण ती नियम व र्निबधानुसारच झाली पाहिजे. मंडळाचे सदस्य अजय थरायिल यांनी सांगितले, की आतषबाजीवर पूर्ण बंदी घालावी, असे माझे मत आहे. दरम्यान, थिरूवमबादी देवासमचे अध्यक्ष प्रा. एम. कुट्टी यांनी सांगितले, की त्रिचूर पूरम महोत्सवाचे आम्ही एक आयोजक असून हा महोत्सव होत आहे, त्या वेळी आम्ही सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून उत्सव पार पाडू. आतषबाजी ही अनेक शतकांची परंपरा आहे त्यामुळे ती चालू राहील, असे त्यांनी सांगितले. केरळचे मुख्यमंत्री ओमेन चँडी यांनी सांगितले, की सरकार आतषबाजीवर र्निबध घालेल पण बंदी घालणार नाही.