जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या पार्थिवासमोरील केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाल्याने वाद निर्माण झाला आहे. अल्फोन्स यांनी पार्थिवासमोर सेल्फी काढल्याचे या छायाचित्रावरुन वाटते. तर अल्फोन्स यांनी हा दावा फेटाळून लावला असून एका व्यक्तीने माझे छायाचित्र काढले होते. तो सेल्फी नव्हता, असा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात अल्फोन्स यांनी आता थेट पोलिसांकडेच तक्रार अर्ज दिला आहे.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यात ४१ जवान शहीद झाले. यात केरळमधील वायनाड जिल्ह्यातील जवान वसंत कुमार यांचा देखील समावेश होता. वसंत कुमार यांचे पार्थिव शनिवारी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. अल्फोन्स हे वसंत कुमार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गेले होते.

अल्फोन्स यांनी सोशल मीडियावर वसंत कुमार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन करतानाचे चार छायाचित्र पोस्ट केले. यातील एका छायाचित्रात अल्फोन्स हे पार्थिवासमोर उभे असल्याचे दिसते. याच छायाचित्रावरुन अल्फोन्स यांच्यावर टीका होत आहे. या छायाचित्रात अल्फोन्स यांनी पार्थिवासमोर सेल्फी काढल्याचे वाटते. ‘शहीद जवानाच्या पार्थिवासमोर सेल्फी काढणे केंद्रीय मंत्र्यांना शोभते का?’, अशी टीका सोशल मीडियावरुन सुरु झाली. सोशल मीडियावर अल्फोन्स हे ट्रोल झाल्याने काँग्रेसच्या काही नेत्यांनी देखील हा फोटो शेअर करत अल्फोन्स यांच्यावर टीका केली.

या वादानंतर अल्फोन्स यांनी आता केरळच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज दिला आहे. माझ्या छायाचित्रावरुन बदनामी केली जात आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. अल्फोन्स यांनी स्थानिक माध्यमांना प्रतिक्रिया देताना सेल्फीचा आरोप देखील फेटाळून लावला. ‘मी पार्थिवासमोर उभे राहून सेल्फी काढलेला नाही. मी पार्थिवाचे दर्शन घेऊन पुढे जाताना एका व्यक्तीने माझा फोटो काढला. माझ्या टीमने तोच फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. त्या फोटोत मी सेल्फी काढल्याचा भास होतो. पण तो प्रत्यक्षात सेल्फी नाही. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी सांगितले.