एका ३६ वर्षाच्या महिलेवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. नऊ वर्षाच्या मुलावर या महिलेने बलात्कार केल्याचे हे धक्कादायक प्रकरण आहे. केरळमध्ये ही घटना घडली असून थेन्हीप्पलम पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलाने मागच्या आठवडयात सर्वप्रथम स्थानिक दवाखान्यातील डॉक्टरकडे याबद्दल वाच्यता केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

डॉक्टरने बाल अधिकारांसाठी काम करणाऱ्या यंत्रणेला याची माहिती दिली. या यंत्रणेने मुलाची जबानी नोंदवून घेतली व पोलिसात तक्रार दाखल केली. पॉस्को कायद्याच्या कलम ५ आणि ६ अंतर्गत पोलिसांनी आरोपी महिले विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मागच्या वर्षभरापासून या मुलाचे लैंगिक शोषण सुरु होते. महिलेने अनेक महिने या मुलाचे लैंगिक शोषण केले त्यामुळे मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला असे बाल अधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्थेने सांगितले.

आरोपी महिला पीडित मुलाची नातेवाईक आहे. ती त्याच्या घराजवळच रहाते. चाईल्डलाईनचे समन्वयक अन्वर काराक्कादान यांनी ही माहिती दिली. चाईल्डलाईनला मुलाने जी जबानी दिली त्याआधारावर तक्रार नोंदवण्यात आली आहे असे पोलीस उपनिरीक्षक बीनू थॉमस यांनी सांगितले. पीडित मुलगा आणि आरोपीच्या कुटुंबामध्ये वाद होता असे पोलिसांनी सांगितले.

महिलेवरील आरोपांचा त्या वादाशी काही संबंध आहे का ? ते आम्हाला तपासावे लागेल. आम्ही लवकरच आरोपीचा जबाब नोंदवून घेणार आहोत असे बीनू थॉमस यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी एर्नाकुलममध्ये दुसऱ्या एका अशाच घटनेत लहान मुलाचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली होती.