केरळात बचावकार्य सुरु असताना थ्रिसूरमध्ये एका महिलेने २५ कुत्र्यांना सोबत घेतल्याशिवाय घर सोडण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. सुनिता असे या महिलेचे नाव असून ती रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचा सांभाळ करते. तिने तिच्या घरात २५ कुत्र्यांना आसरा दिला आहे. प्राणी मित्र संघटनेचे कार्यकर्ते जेव्हा सुनिताच्या घरी पोहोचले तेव्हा घरात सर्वत्र पाणी भरलेले होते. सर्व कुत्री भेदरलेल्या अवस्थेत बिछान्यावर बसलेली होती असे हयुमन सोसायटी इंटरनॅशनलच्या साली वर्मा यांनी सांगितले.

केरळमधील बहुतांश जिल्हे पाण्याखाली असून थ्रिसूर जिल्ह्यातही पुरामुळे वाईट स्थिती आहे. कुत्र्यांना सोबत नेणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर सुनिताने बचाव पथक व प्राणी मित्र संघटनेच्या स्वयंसेवकांना माघारी पाठवून दिले. ती महिला घर सोडायला तयार नसल्याने अखेर बचावपथकांनी त्या महिलेसह तिच्या २५ कुत्र्यांची पुराच्या पाण्यात सुटका केली व त्यांना सुरक्षित स्थळी आणून सोडले.

मदत छावण्यामध्ये प्राण्यांना प्रवेश नसल्याने सुनिता, तिचा नवरा आणि सर्व कुत्र्यांना विशेष निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर सुनिताला तिच्या घरी कुत्र्यांच्या निवासासाठी खोली बांधता यावी यासाठी मदतनिधी गोळा करण्यास सुरुवात केल्याचे साली वर्मा यांनी सांगितले.