केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील मत्तानूर येथे माकपच्या कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसच्या २९ वर्षीय नेत्याची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडल्याचे पोलिसांनी सांगितले. कारमधून आलेल्या चार हल्लेखोरांनी सुहेब मत्तानूर प्रखंड आणि पक्षाच्या इतर दोन सदस्यांवर देशी बॉम्ब फेकले आणि शस्त्राने वार केला. यात सुहेब यांचा मृत्यू झाला.

सुहेब मत्तानूर प्रखंड हे युवक काँग्रेसचे सचिव होते. सुहेब हे आपले सहकारी थेऊर आणि रियाजसह रस्त्याच्याकडेला असलेल्या एका चहाच्या दुकानात गप्पा मारत उभे होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या सुहेल यांना थालचेरी येथील इंदिरा गांधी सहकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.

मागील आठवड्यात झालेल्या राजकीय वादातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  भारतीय दंड विधानानुसार विविध कलमे आणि स्फोटक पदार्थ अधिनियम कलम तीन आणि पाच अंतर्गत संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसने बुधवारी या हल्ल्याविरोधात बंदची घोषणा केली आहे.