जमिदा टिचर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिम महिलेने शुक्रवारी पहिल्यांदाच जुम्मा नमाजाचे नेतृत्त्व केले. जुम्मा (शुक्रवार) नमाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.  कुराण सुन्नथ सोसायटी या संस्थेच्या ५० सदस्यांनी त्यांच्या कार्यालयात नमाज अदा केली. त्यावेळी या नमाजचे नेतृत्त्व इमाम जमिदा यांनी केले. केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात असलेल्या कोझिकोडे या गावात नमाजचे नेतृत्त्व करणाऱ्या या जमिदा टिचरने इतिहास रचला मात्र आता त्यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या यायला सुरुवात झाली आहे. तसेच अनेक लोक त्यांच्यावर खालच्या भाषेतही टीका करत आहेत.

जमिदा टीचर या कुराण सुन्नथ सोसायटी सचिव आहेत तसेच त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही काम करतात. जमिदा टीचर त्यांच्या जमिदा याच नावाने ओळखल्या जातात त्यांनी कोणतेही आडनाव लावलेले नाही. इस्लाम धर्मात असे कुठेही म्हटलेले नाही की नमाज अदा करताना त्याचे नेतृत्त्व पुरुषानेच केले पाहिजे. नमाज अदा करताना नेतृत्त्व करणारा माणूस पुरुषच असला पाहिजे हे कथित धर्मरक्षकांनी रचलेले आहे. यात काहीही तथ्य नाही असेही जमिदा यांनी म्हटले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

जमिदा यांनी घेतलेला निर्णय खरेतर कौतुकास्पद आहे. मात्र परंपरेची झुल पांघरणारे लोक त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. महिला या महिलांच्या नमाजाचे नेतृत्त्व करू शकतात मात्र पुरुषांच्या नमाजाचे नेतृत्त्व पुरुषानेच केले पाहिजे असे मत अब्दुल हमीद फैजी यांनी व्यक्त केले आहे. तसेच जमिदा यांनी नमाजचे नेतृत्त्व करणे हे इस्लामविरोधी कृत्य आहे असेही त्यांनी म्हटले आहे. काही इस्लाम विरोधी संघटनांनी जमिदा यांना असे करण्यासाठी तयार केले असावे असाही आरोप होऊ लागला आहे. पुरुषांसाठी इमाम म्हणून काम करेल अशी महिलांची कोणतीही परंपरा मुस्लिमांमध्ये नाही त्याचमुळे जमिदा यांनी केलेली कृती योग्य नाही अशाही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

मी केलेल्या कृतीनंतर मला धमक्या येऊ लागल्या आहेत. लोक खालच्या भाषेत टीका करत माझ्याशी फोनवरून संपर्क साधत आहेत मात्र मी मागे हटणार नाही अशी भूमिका जमिदा यांनी घेतली आहे. केरळमधील इतर भागातही मी नमाजचे नेतृत्त्व करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. जमिदा टीचर यांची कृती योग्य नाही. इस्लामचा अपमान करण्याच्या उद्देशाने आणि चर्चेत येण्यासाठी त्या अशा प्रकारे वागत आहेत अशी टीका विस्डम ग्लोबल इस्लामिक मिशनचे प्रवक्ते सी. पी सलीम यांनी केली आहे.