प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला होता. एका गटाने लाल किल्ल्यावर जाऊन पोलिसांना मारहाण करण्याबरोबरच धार्मिक ध्वज फडकावला होता. लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत. या घटनेप्रकरणी अभिनेता यापूर्वी दीप सिद्धू याला पोलिसांनी अटक केलेली आहे.

  1. महिंदर सिंग उर्फ मोनी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मोनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. हिंसाचाराच्या घटनेपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. ३० वर्षीय मोनी दिल्लीतीलच स्वरूप नगर येथील रहिवासी असून, त्याला पितम पुरा बस स्थानकाजवळ दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. दिल्ली पोलिसांच्या व्हिडीओत महिंदर तलवारीसह हिंसाचारात सहभागी असल्याचं दिसत आहे.

मोनीच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. यावेळी दोन तलवारी सापडल्या. पोलिसांनी तलवारी जप्त केल्या असून, आरोपी महिंदर सिंगची चौकशी पोलिसांकडून केली जात आहेत. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात अभिनेता दीप सिद्धूबरोबरच महिंदर सिंग मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारच मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर अचानक एक गट लाल किल्ल्याकडे गेला. त्यानंतर लाल किल्ल्यावर हिंसाचार उफाळून आला होता. या घटनेचे तीव्र पडसाद नंतर उमटले. तसेच लाल किल्ल्यावरील हिंसाचारामागे दीप सिद्ध असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच दीप सिद्धूला अटक केली होती. त्याचबरोबर इतर आरोपींचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. शोध सुरू असतानाच पोलिसांनी महिंदर सिंगला अटक केली.