जामा मशीद आणि वाराणसी येथील स्फोटांची जबाबदारी स्वीकारणारे निनावी ई-मेल माध्यमांना पाठविणारा इंडियन मुजाहिदीनचा मुख्य दहशतवादी एजाज शेख (२७) याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेशातील सहारणपूर रेल्वे स्थानकाबाहेर शुक्रवारी रात्री अटक केली. मूळचा पुण्याचा असलेला शेख याचा हवाला व्यवहारातही हात होता.
विशेष पोलिसांना मिळालेल्या खबरीवरून त्यांनी शेख याला अटक केली. मुजाहिदीनच्या कारवायांना शेख हा साधनसामग्री पुरवित होता. इंडियन मुजाहिदीनचे संस्थापक रियाज भटकळ आणि मोहसीन चौधरी यांच्याशी त्याचे निकटचे संबंध होते. शेख हा चौधरी याचा मेहुणा होता. बाटला हाऊस चकमकीनंतर भटकळ आणि चौधरी पाकिस्तानात पसार झाले. त्यानंतर शेखने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली, असे विशेष पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले.
मुजाहिदीनच्या अनेक दहशतवाद्यांना अटक केल्यानंतरही पोलिसांना आणि माध्यमांना निनावी ई-मेल पाठविणाऱ्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. ‘अल अरबी’ अशी स्वाक्षरी करून हे ई-मेल पाठविले जात होते आणि जामा मशीद आणि वाराणसीतील स्फोटांची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती त्यामुळे पोलीस चक्रावले होते. शेख हा तंत्रज्ञानात तज्ज्ञ असल्याने त्याचा ठावठिकाणा मिळण्यात अडचणी येत होत्या.
ई-मेल पाठविण्याबरोबरच शेख भारतातील घातपाती कृत्यांसाठी साधनसामग्री पुरवित होता. रियाज भटकळ आणि चौधरी यांच्याकडून पाकिस्तानातून संदेश घेऊन ते येथे पाठविण्यात शेख तरबेज होता. मोबाइलचे सीमकार्ड, परदेशातून आलेला पैसा गोळा करणे, भाडय़ाने खोली उपलब्ध करून घेणे असे प्रकारही शेख करीत होता.
मुजाहिदीनचा भारतातील प्रमुख तेहसीन अख्तर ऊर्फ मोनू याला गेल्या मार्च महिन्यात विशेष दलाच्या अधिकाऱ्यांनी भारत-नेपाळ सीमेवर अटक केली होती. याच पथकाने राजस्थानमधून मुजाहिदीनचा अतिरेकी झिया-ऊर-रेहमान ऊर्फ वकास याला तीन साथीदारांसह अटक केली होती.
इजाज निर्दोष असल्याचा वडिलांचा दावा
इजाज सईद शेख निर्दोष असल्याचा दावा त्याचे वडिल सईद अब्दुल कादर शेख यांनी केला आहे. ‘माझा मुलगा निर्दोष आहे. त्याला खोटय़ा गुन्ह्य़ात गोवण्यात आले आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे तो घर सोडून गेला होता. मोहसीन चौधरी घर सोडून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाची वाताहत झाल्याचे इजाजने डोळ्याने पाहिले होते. तो असे कोणतेही कृत्य करणार नाही. याप्रकरणी चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना वेळोवेळी आम्ही मदत केली आहे, असे सईद यांनी म्हटले आह़े