प्रमुख माओवादी नेता किरण कुमार उर्फ किरण दादा आणि त्याची पत्नी नर्मदा यांना आंध्र प्रदेशमधुन अटक करण्यात महाराष्ट्र पोलीसांना यश आले आहे.

किरण कुमार हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी (डीकेएसझेडसी) चा सदस्य आहे. शिवाय महाराष्ट्रातील गडचिरोलीत सक्रीय असलेल्या माओवादी चळवळीचा प्रभारी आहे. गडचिरोलीचा दंडकारण्य विभागात समावेश आहे. हे दाम्पत्य छत्तासगढमध्ये सक्रीय आहे, त्यांच्यावर प्रत्येकी तब्बल २० लाखांचा इनाम होता.

५७ वर्षीय किरण हा चष्मा घालताे व तो मुळचा विजयवाडा येथील आहे. याशिवाय तो राज्य समिती सदस्य आहे आणि प्रभात मासिकाचे काम पाहातो. माओवादाचा राजकीय अंग असलेल्या ‘डीकेएसझेडसी’च्या प्रचार विभाग, माध्यम आणि शिक्षण यांचे देखील तो काम पाहायचा, त्यांला तांत्रिकगोष्टींचे उत्तम ज्ञान होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तर त्याची पत्नी नर्मदा ऊर्फ अलारी कृष्णा कुमारी ऊर्फ सुजाथक्का ही कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील आहे. २२ वर्षांपासून ती भूमिगत होती. सुत्रांच्या माहितीनुसार मे महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात (आयईडी) १६ जणांचा मृत्यू झाला होता ज्यामध्ये १५ जवानांचा समावेश होता. हा स्फोट घडवण्यात किरण कुमारचा हात होता.