संसदेवर खलिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याने दिल्लीतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. प्रतिबंधित खलिस्तानी संघटनेतील दोन दहशतवादी संसदेवर हल्ला करणार असून हल्ल्यासाठी उत्तर प्रदेशमधील कार वापरण्यात येईल, अशी माहिती देखील गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार गुप्तचर यंत्रणांनी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लखविंदर सिंग आणि परमिंदर सिंह हे दोन खलिस्तानी दहशतवादी नेपाळमार्गे भारतात आले असून ते दोघे इनोव्हा कारने भारतात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. दिल्ली पोलिसांनाही निनावी फोनद्वारे ही माहिती मिळाली होती. गुप्तचर यंत्रणा व दिल्ली पोलीस या दोन्ही यंत्रणांना एकाच वेळी ही माहिती मिळाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. दिल्ली पोलिसांनी तो मोबाईल क्रमांक ट्रेस केला असून तो क्रमांक उत्तराखंडमधील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांची एक टीम उत्तराखंडला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला केला जाईल, अशी माहिती उघड झाली आहे. चोरी केलेल्या सरकारी वाहनात बॉम्ब ठेवूनही हल्ला घडवला जाऊ शकतो, अशी माहिती देखील गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

एप्रिलमध्ये खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या म्होरक्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ज्या दोन दहशतवाद्यांची नावे गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहेत, ते दहशतवादी लिबरेशन फोर्सच्या म्होरक्याचे निकटवर्तीय होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.