बिशदा गावात प्रतिबंधात्मक आदेश

उत्तर प्रदेशातील दादरी येथे नऊ महिन्यांपूर्वी घरात गोमांस सापडल्याच्या संशयावरून ठार करण्यात आलेल्या महंमद अखलाख यांच्या कुटुंबीयांविरोधात नव्या तपासणी अहवालाद्वारे गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीवर महापंचायत आयोजित केल्याने बिशदा खेडय़ात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. आधीच्या अहवालानुसार अखलाख कुटुंबीयांच्या घरात बकरीचे मांस सापडले होते. आता नवीन अहवालाच्या आधारे अखलाख कुटुंबीयांच्या घरी सापडलेले गोमांस होते असे सांगण्यात आले आहे. गौतमबुध नगरचे जिल्हा दंडाधिकारी एन.पी.सिंग यांनी दादरीतील बिशदा खेडय़ात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे, कारण तेथे महापंचायचीचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर या गावात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अखलाख कुटुंबीयांकडे सापडलेले गोमांस होते असे न्यायवैद्यक अहवालात म्हटल्याने या कुटुंबाविरोधात नव्याने गोहत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या गावातील रहिवाशांनी गौतम बुद्ध नगरच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांकडे केली होती. पोलिसांनी अखलाख कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला नाही तर महापंचायत घेतली जाईल अशा इशारा या प्रकरणातील आरोपी विशाल राणा याचे वडील संजय राणा यांनी दिला आहे.नव्या अहवालाच्या आधारे पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. अखलाख याच्या फ्रीजमध्ये सापडलेले गोमांस होते असे नव्या अहवालात म्हटले आहे. या स्थितीत आम्ही महापंचायत घेत असून सथा चौरासी खेडय़ातील लोकही या वेळी येणार आहेत असा दावा राणा यांनी केला. विश्व हिंदू परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांनी या खेडय़ास भेट दिली व विशाल राणा याला अखलाख यांच्या हत्येत गुंतवण्यात आल्याचा आरोप केला. काँग्रेसने मात्र भाजपवर टीका केली असून हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

महेश शर्माची मुख्यमंत्र्यांवर टीका

महंमद अखलाख यांच्या घरात गोमांस सापडल्याच्या न्यायवैद्यक अहवालावर शंका घेणाऱ्या मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी टीका केली. त्यांच्या सरकारचा भाग असलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर विश्वास नसेल तर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. सादुलापूर येथील सभेत त्यांनी सांगितले की, मथुरा येथील घटनेतही अधिकाऱ्यांनी काढलेल्या निष्कर्षांवर अखिलेश यांचा विश्वास नाही. दादरी घटनेनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिशदा येथे भेट देऊन राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला होता. आता न्यायवैद्यक खात्याचा अहवाल आला असून त्यात सत्य उघड झाले आहे, असे महेश शर्मा यांनी सांगितले.