नवे सीबीआय संचालक ऋषी कुमार शुक्ला यांची निवड सर्वसहमतीने झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीचे सदस्य असलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी नव्या सीबीआय संचालकांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. खरगे यांनी नव्या सीबीआय संचालकांच्या निवडीवर असहमतीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

ऋषी कुमार शुक्ला यांना भ्रष्टाचार विरोधी प्रकरणे हाताळण्याचा फारसा अनुभव नसल्यामुळे त्यांच्या निवडीवर खरगे यांनी आक्षेप घेतला आहे. सरकारने ऋषी कुमार शुक्ला यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर खरगे यांनी हे पत्र पाठवले. १९८३ बॅचचे अधिकारी असलेले ऋषी कुमार शुक्ला हे मध्य प्रदेशचे माजी डीजीपी आहेत. मध्य प्रदेशात नव्याने सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने तीन दिवसांपूर्वीच त्यांना डीजीपी पदावरुन हटवले होते.

ऋषी कुमार शुक्ला यांची निवड करुन निवड समितीने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि डीएसपीई कायद्याचे उल्लंघ केले आहे असे खरगे यांनी म्हटले आहे. या निवड समितीमध्ये पंतप्रधान मोदींसह सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि स्वत: खरगे यांचा समावेश होतो. खरगे लोकसभेतील काँग्रेसचे नेते असल्याने ते या समितीमध्ये आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी खरगे यांचा आरोप फेटाळून लावताना त्यांना आपल्या पसंतीचा अधिकारी हवा होता असे म्हटले आहे.