न्यूयॉर्कमधील भारताच्या  उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांनी व्हिसा अर्जात नमूद केल्याप्रमाणे मोलकरणीस वेतन न दिल्याच्या प्रकरणानंतर त्यांची संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी दूतावासात बदली करण्यात आल्यानंतर आता त्यांची राजनैतिक अधिकारपत्रे संयुक्त राष्ट्रांकडून परराष्ट्र खात्याकडे आली आहेत, त्यांची छाननी सुरू आहे, असे अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले.
परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले, की संयुक्त राष्ट्रांकडून देवयानी खोब्रागडे यांच्या बदलीबाबतची सर्व कागदपत्रे शुक्रवारी मिळाली असून त्याचा आढावा घेतला जात आहे. त्यावर नेमका निर्णय कधी होणार हे मात्र सांगण्यात आलेले नाही. परराष्ट्र खात्याच्या निर्णयानंतरच देवयानी खोब्रागडे यांना नवे ओळखपत्र मिळणार आहे.
 दरम्यान, त्यांची केलेली बदली संयुक्त राष्ट्रांनी या अगोदरच मान्य केली असून, पुढील कारवाईपासून सुरक्षितता मिळवण्यासाठी भारताने त्यांची बदली करण्याचे पाऊल उचलले होते. त्यांना नवीन ओळखपत्र मिळाल्यानंतर त्यांना कुठल्याही कारवाईपासून संरक्षण मिळेल हे खरे असले तरी तो नियम पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल की नाही यावर वाद आहेत. तूर्त तरी त्यांना खटल्याच्या कामकाजात व्यक्तिगत उपस्थिती लावण्यात सूट देण्यात आली आहे.