केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी आपल्याला देशाबाहेर बदनाम करण्यासाठी कट आखला होता व बुधवारी अमेरिकी विमानतळावर आपल्याला स्थानबद्ध करण्यात आले, हा या कटाचाच भाग होता, असा आरोप उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केला आहे.
त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारचा पाठिंबा कायम ठेवायचा किंवा नाही याचा निर्णय समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव हे आपण व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच करतील.
मुलायमसिंह यांना नेमके काय घडले याची कल्पना आहे व यूपीए सरकारचा पाठिंबा चालू ठेवायचा की नाही याचा निर्णय तेच घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘आम्हाला अमेरिकेत ज्या स्थितीला तोंड द्यावे लागले त्याची तुलना ही कलाम, शाहरुख खान व राजदूत हरदीप पुरी तसेच अमेरिकी राजदूत मीरा शंकर यांच्या झालेल्या मानहानीशी करता येणार नाही, कारण आपला जो अपमान करण्यात आला तो एक कट होता. मी भारतातील काँग्रेसेतर शक्तिशाली मुस्लीम नेता असल्याने खुर्शीद यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची ताकद पणाला लावून अमेरिकेतील अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाला हाताशी धरले. बोस्टन लॉगन विमानतळावर मला स्थानबद्ध करण्यात आले हे इतरांपेक्षा वेगळे प्रकरण आहे. भारतात मला विरोध करायची हिंमत नाही, त्यामुळे खुर्शीद व त्यांच्या चौकडीने हे सगळे घडवून आणले. भारतीय शिष्टाचार अधिकारी आम्हाला विमानतळावर भेटायला आले होते. ते अपरिचितासारखे आमच्याशी वागले व मूकपणे सगळे बघत होते. त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून अलिप्त राहण्याबाबत सूचना मिळाल्या असाव्यात. ४५ मिनिटे आपल्याला स्थानबद्ध केले तेवढय़ा वेळात भारतीय अधिकाऱ्यांना न्यूयॉर्क दूतावासाशी किंवा भारतीय राजदूत निरुपमा राव यांच्याशी संपर्क साधता आला असता, पण त्यांनी काहीच केले नाही. मला संकटातून बाहेर काढण्यासाठी कुणी एक शब्दही खर्च केला नाही.’’
खुर्शीद परराष्ट्रमंत्री असताना भारत सरकारने या घटनेचा निषेध करण्याची अपेक्षाच करता येत नाही, खुर्शीद
यांनी माझ्या राज्यात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, त्यामुळे त्यांनी परदेशात मला बदनाम करण्याचा घाट घातला. परराष्ट्रमंत्री पदावर राहण्यास ते लायक नाहीत, असा दावा खान यांनी केला.