सत्य, प्रेम आणि इवलासा खोडसाळपणा.. हीच ज्यांची लेखनशैली अशा मनमौजी पत्रकार-साहित्यिकाने, खुशवंतसिंग यांनी गुरुवारी जीवनाच्या रंगमंचावरून प्रयाण केले. वयाच्या शंभरीकडे वाटचाल करीत असलेल्या या सदाबहार व्यक्तिमत्त्वाचे नवी दिल्ली येथे निधन झाले. मनसोक्त जीवनानंद घेत, आयुष्यावर आणि आयुष्यातील अवघ्या सुंदरतेवर प्रेम करणाऱ्या खुशवंतसिंग यांची ‘ट्रेन टू पाकिस्तान’ ही कादंबरी विश्वविख्यात ठरली. त्यानंतर त्यांच्या लेखणीने आपल्या लालित्य आणि वैविध्याचा प्रत्यय वारंवार दिला. राजकीय लेखन असो की उर्दू शायरीचा मागोवा असो, ओघवत्या इंग्रजी कादंबऱ्या असोत की आपल्याच शीख समाजावर केलेले प्रसन्न विनोद असोत, खुशवंत सिंगांची लेखणी तळपत राहिली. अनेक वादांना जन्माला घालणाऱ्या, अनेक वाद अंगावर घेणाऱ्या त्यांच्या शैलीदार लेखनाने सत्तरीच्या दशकातील पत्रकारितेलाही नवा चेहरा दिला. वयाच्या ९९व्या वर्षांपर्यंत त्यांची लेखनकामाठी सुरूच होती.