दिवंगत प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंह यांची कादंबरी अश्लील असल्याचे कारण देत रेल्वे अधिकाऱ्यांनी भोपाळ रेल्वे स्थानकाच्या स्टॉलवरुन हटवली आहे. भावी पिढीचे या पुस्तकामुळे नुकसान होईल असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे वाद निर्माण झाला असून रेल्वे अधिकारी अशा प्रकारे मनमानी कारभार कसा करु शकतात, असा सवाल काही बुद्धिजीवी वर्गाकडून करण्यात येत आहे.

‘वुमन, सेक्स, लव्ह अँड लस्ट’ या नावाची ही कादंबरी असून रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेश चंद्र रत्न यांनी बुधवारी भोपाळ रेल्वे स्थानकाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी स्टेशनवरील पुस्तक विक्रेत्याला या कादंबरीची विक्री थांबवण्याचे आदेश दिले. ही कादंबरी म्हणजे अश्लील साहित्य असून भावी पिढीसाठी ती योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. रेल्वे स्थानकांमध्ये केवळ राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि प्रादेशिक साहित्य किंवा मासिकं विक्रीसाठी ठेवता येतील आक्षेपार्ह, अश्लील आणि वैद्यकीय स्वरुपाची कोणतीही पुस्तके विक्रीसाठी ठेऊ नयेत असे आदेशही यावेळी रत्न यांनी दिले.

रत्न हे भाजपाचे नेते असून सुप्रीम कोर्टात वकील म्हणूनही काम करतात. त्यांनी तपासणी मोहिमेंतर्तगत भोपाळ रेल्वे स्थानकाला भेट दिली. यामध्ये त्यांना खुशवंत सिंग यांची कादंबरी आणि ‘प्रेगन्सीमध्ये काय काळजी घ्यायची’ अशा मथळ्याचे आणखी एक पुस्तक दिसले ही दोन्ही पुस्तके विक्रेत्याला त्यांनी स्टॉलवरुन काढून टाकण्यास सांगितले. तसेच विक्रेत्याला इशारा दिला की जर पुन्हा अशी पुस्तकं स्टॉलवर दिसली तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

दोन महिन्यांपूर्वी असाच प्रकार नवी दिल्लीतही घडला होता. रेल्वे स्टेशनवर अधिकाऱ्यांना प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांची ‘हाफ गर्लफ्रेंड’ हे पुस्तक विक्रीसाठी ठेवलेले दिसले. या पुस्तकावरही त्यांनी आक्षेप घेतला होता.