येथील एका महाविद्यालयातून चार जणांनी सकाळी एका मुलीचे अपहरण केले, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली होती. नंतर काही तासातच या मुलीची गुरगाव पोलिसांच्या विशेष पथकाने सुटका केली. या मुलीला पळवून नेताना पाहणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस तिचा शोध घेऊ शकले.
गुरगावचे पोलिस आयुक्त नवदीप सिंग विर्क यांनी सांगितले की, सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार घडला होता, आता ती सुरक्षित घरी परत आली असून पोलीस तिच्याशी बोलले आहेत. तीन आरोपींची नावे समजली असून त्यांची ओळख पटली आहे, त्यांना अटक करण्यात येईल. आरोपी मुलीच्या ओळखीतील होते. द्रोणाचार्य सरकारी महाविद्यालयाच्या बाहेरून या मुलीला पळवून नेण्यात आले होते. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण झाले आहे. त्यात ही मुलगी ओरडत होती व मारूती स्विफ्ट गाडीचे दार पायाने उघडण्याचा प्रयत्न करीत होती. बाहेरील व्यक्तींचे लक्ष वेधून घेत होती. अपहरणकर्ते सकाळी तोडलेली भिंत ओलांडून महाविद्यालयात आले, या मुलीला बोलवले असे उपायुक्त कुलविंदर सिंग यांनी सांगितले. तिच्याशी बोलल्यानंतर एकाने तिला जबरदस्ती गाडीत बसवले, त्यात त्याचे तीन साथीदार वाट पहात होते. ती मुलगी भिंतीजवळ येताच त्यांनी तिला गाडीत ओढले व पळून गेले. मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केला, त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या एकाला ही गोष्ट समजली. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. मोटारीचा क्रमांक माहिती नव्हता, कारण त्यावर चिखल लागलेला होता. याप्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात येत असून महाविद्यालय व्यवस्थापन व साक्षीदारांचे जबाब घेण्यात येत आहेत. हा अपहरणाचा पूर्वनियोजित कट होता असे दिसून आले आहे. दरम्यान साक्षीदाराने सांगितले की, आपण थोडे अंतर या मोटारीचा पाठलाग केला. ती मुलगी मदतीसाठी ओरडत होती. सेक्टर ४-७ पर्यंत गेली. नंतर ती पतौडी मार्गाने गेली असावी. एक जण मोटार चालवत होता व बाकीच्यांनी तिला धरून ठेवले होते, ती १९ वर्षांची होती. तिने लाल सलवार व पिवळा दुपट्टा घातला होता.