महिला लग्नाला तयार होत नाही म्हणून आरोपीने तिच्या चार वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. महिला दबावाखाली येऊन लग्नाचा प्रस्ताव स्वीकारेल म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पूर्व दिल्लीतील मधू विहार येथे रविवारी ही घटना घडली. १६ जूनला महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली.

तिने शिवकुमारवर मुलाचे अपहरण केल्याचा आरोप केला. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्यांना मुलगा आणि आरोपी कनॉट प्लेस येथे असल्याचे समजले. त्यांनी शिवकुमारला अटक करुन मुलाची सुटका केली. तक्रारदार महिलेसोबत लग्न करायचे होते पण ती लग्नाला तयार होत नसल्याने दबाव आणण्यासाठी आपण तिच्या मुलाचे अपहरण केले असे शिवकुमारने पोलीस चौकशीत कबूल केले.

आरोपी ईदच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला होता. जेव्हा महिला घराबाहेर गेली तेव्हा शिवकुमारने संधी साधून तिच्या मुलाला पळवले. शिवकुमार मुलाला घेऊन कोलकात्याला जाणार होता पण पोलिसांनी त्याला अटक करुन त्याचा कट उधळून लावला.