सोशल नेटवर्कींगच्या महाजालात सुप्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर पैशांचे आमिष दाखवून किडनी विकत घेणाऱयांची टोळी कार्यरत असल्याचा दावा एका पोलीस अधिकाऱयाने केला आहे.
फेसबुकच्या माध्यमातून ही टोळी लोकांशी संपर्क साधते आणि त्यांना पैशांचे आमिष दाखवून आपले महत्वाचे अवयव विकण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलीस महानिरीक्षक(नागरी सुरक्षा) अमिताभ ठाकूर यांनी यांनी उत्तरप्रदेशातील स्थानिक पोलीस ठाण्यात या टोळीबद्दल रितसर तक्रार नोंदविली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ही टोळी लोकांशी संपर्कसाधून एका किडनीसाठी तब्बल तीन ते चार लाख रुपयांचे आमिष दाखवत असल्याचेही ते म्हणाले. तसेच त्यांच्या एका मित्राला या टोळीने फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधून किडनीसाठी ३.५ लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगितले आणि बँक खाते क्रमांकाचीही विचारपूस देखील केली गेली असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे.