आत्महत्या करण्यापेक्षा पोलिसांना ठार मारा, असा वादग्रस्त सल्ला पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दकि पटेल याने शनिवारी समुदायाच्या एका तरुणाला दिला.

तुमच्यात एवढे धैर्य असेल, तर जा आणि दोन-तीन पोलिसांना ठार करा. पटेल कधीही आत्महत्या करत नाहीत, असे हार्दिकने सुरतमधील विपुल देसाई या युवकाशी बोलताना सांगितले. पटेल आंदोलनाच्या समर्थनार्थ आपण आत्महत्या करणार असल्याचे त्याने जाहीर केले होते.

एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसह हार्दिकने शनिवारी विपुल देसाईच्या घरी भेट दिली. या भेटीचे चित्रण वाहिनीने नंतर प्रक्षेपित केले. आपण पटेलांचे बेटे आहोत. त्यामुळे आत्महत्येचा विचार करण्यापेक्षा आपण दोन-तीन पोलिसांना ठार मारायला हवे, असे सांगून स्वत:चा जीव न घेण्याचा सल्ला हार्दकिने मला दिला, असे विपुलने नंतर पत्रकारांना सांगितले.

पटेल समुदायाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सर्वप्रथम आंदोलन सुरू करणाऱ्या सरदार पटेल ग्रूपचे संयोजक लालजी पटेल यांनी आपले आंदोलन गांधीजींच्या मार्गाने सुरू असल्याचे सांगून हार्दिकच्या वक्तव्यापासून अंतर राखले. त्याने जबाबदारीने वक्तव्य करावे, असा सल्लाही लालजींनी दिला.