बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचे परखड मत
मांस खाण्याच्या कारणावरून लोकांना ठार मारणे ही असहिष्णुता नसून, क्रूर व हीन प्रकारचा गुन्हा आहे व हे प्रकार थांबले पाहिजेत, असे परखड मत बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केले आहे.
कोझीकोड येथील साहित्य महोत्सवात सहभागी झाल्यानंतर त्यांनी मल्याळी वाहिनीला सांगितले, की मांस खाण्यावरून लोकांना ठार मारणे ही असहिष्णुता नसून, क्रूर स्वरूपाचा गुन्हा आहे. भारतात असहिष्णुता एकदम सुरू झाली नाही. भारतीय राज्यघटना असहिष्णुतेला थारा देत नाही व कायद्यानेही त्याला विरोधच आहे, पण सगळीकडेच काही असहिष्णू लोक असतात. येथे असहिष्णुतेला धर्मनिरपेक्ष लोक विरोध करतात हे चांगलेच आहे, मांस खाण्यावरून लोकांना ठार मारण्याचे प्रकार थांबले पाहिजेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असताना भारताचे नागरिकत्व स्वीकारावेसे वाटते का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की सध्याचे सरकार पक्षपाती नाही व धर्मनिरपेक्ष आहे. आपल्याला येथे सरकारने राहू दिले तर चांगलेच आहे. पाकिस्तानी गायक अदनान सामी याला भारत सरकारने भारतीय नागरिकत्व दिले ही चांगली गोष्ट होती.
अनुपम खेर यांना कराची साहित्य महोत्सवासाठी व्हिसा नाकारल्याच्या प्रकरणी त्यांनी सांगितले, की पाकिस्तानने तसे करायला नको होते. भाजप नेते अडवाणी काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेले होते. ते धर्मनिरपेक्ष व चांगले गृहस्थ आहेत. भारतावर प्रेम करणारे लोक तेथेही आहेत, सगळे लोक भारतविरोधी, हिंदूविरोधी व मूलतत्त्ववादी नाहीत.