फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या जमावात ट्रक घुसवून करण्यात आलेल्या घातपातामध्ये आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. फ्रान्समधील नीस शहरात गुरूवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, या ठिकाणी राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी गर्दी जमली होती. त्यावेळी अचानक एका ट्रक चालकाने या जमावावर ट्रक चालवून अनेकांना चिरडले. ताज्या माहितीनुसार, बेदरकार ट्रक चालवून शेकडो जणांना चिरडणारा नराधम हा मूळचा ट्युनिशियन वंशाचा असून, फ्रान्सचा नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. तो नीस शहरातच राहात होता. यापूर्वीही त्याच्यावर बेदरकारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

वाचा :
नीसमधील हल्ला दहशतवादी हल्ल्याइतकाच गंभीर, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून निषेध

ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता आणि त्यातून गोळ्यांचा आवाज येत होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप त्यास दुजोरा दिलेला नाही. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी संबंधित घटनेची माहिती घेऊन घडलेली दुर्घटना ही दहशतवादी सदृश असल्याचे सांगितले आहे. ओलांद हे एविनोन दौऱयावर होते. घटनेची माहिती मिळताच ते दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले आहेत. ओलांद यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. ते म्हणाले की, ८० निष्पापांचा बळी घेणारा हा हल्ला दहशतवादी सदृश असून, या अमानवी कृत्याचा आम्ही निषेध करतो. याशिवाय, ओलांद यांनी या घटनेच्या निषेधार्थ तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील जाहीर केला आहे.

दरम्यान, घडलेली दुर्घटना हा दहशतवादी हल्ला आहे का? याचा तपास फ्रान्स पोलिसांनी सुरू केला आहे. सुदैवाने फ्रान्समधील भारतीय नागरिक सुखरूप  याआधी, २०१५ मध्ये देखील फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३० जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समधील आणीबाणीचा कालावधी तीन महिन्यांनी वाढविण्यात आला आहे.