उत्तर कोरियाच्या लष्कराने दोन आठवड्यांपूर्वी हूकूमशाह किम जोंग-उन यांच्या आदेशानुसार देशाच्या सीमेवरील दक्षिण कोरियाबरोबरच चर्चा करण्यासाठी संयुक्तरित्या उभारण्यात आलेली चौकी बॉम्बने उडवली होती. आता यासंदर्भातील एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दक्षिण कोरियामध्ये किम जोंग उनच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले जात होते. तसेच दक्षिण कोरियामधून सोडण्यात येणाऱ्या फुग्यांवरून हे फोटो उत्तर कोरियाच्या भागामध्ये पाठवले जात होते असं सांगण्यात येत आहे. यावरुनच संपातपलेल्या जोंग यांनी बॉम्बने चौकी उडवण्याचा आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. न्यू यॉर्क पोस्ट, डेली मेल यासारख्या वृत्तपत्रांनी यासंदर्भातील वृत्तांकन केलं आहे.

जोंग यांच्या आदेशावरुन बॉम्ब हल्ला करुन उडवण्यात आलेली चौकी ही उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर असणाऱ्या कायेसोंग शहरामध्ये होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियादरम्यान सध्या ‘लीफलेट वॉर’ म्हणजेच अपप्रचार करणारे साहित्य पाठवण्याचे प्रकार सुरु आहे. उत्तर कोरियाच्या सीमा भागांमध्ये दक्षिण कोरियामधून सत्ताधाऱ्यांना म्हणजे जोंग-उन यांना विरोध करणारा मजकूर पाठवला जात आहे. या मजकूरामध्ये आता किम जोंग-उनबरोबरच त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केवळ मजकूर नाही तर या दोघांचे आक्षेपार्ह फोटोही शेजारच्या देशामधून फुग्यांच्या माध्यमातून उत्तर कोरियामध्ये पाठवण्यात येत आहे. उत्तर कोरियामधील रशियन दुतावासानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रशियन राजदूतांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियातून पाठवण्यात येणाऱ्या फुग्यांच्या माध्यमातून किम जोंग-उन आणि त्यांची पत्नी री सोल जू यांचे घाणेरडे आणि घृणास्पद फोटो उत्तर कोरियातील भागांमध्ये पाठवले जात आहे.

उत्तर कोरियामधील काही बंडखोर दक्षिण कोरियामधून काही फुगे सोडतात. तसंच त्यात किम जोंग उन यांच्या हुकुमशाहीविरोधात काही संदेशही लिहिलेले असतात असं उत्तर कोरिया सरकारने काही आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. या संपूर्ण प्रकारानंतर संतापलेल्या किम जोंग उन यांनी दक्षिम कोरियाशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णयही जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेतला होता. दक्षिण कोरियाच्या काही अधिकाऱ्यांनी उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेतृत्वाची (किम जोंग उन) प्रतीमा मलिन केली आहे. तसंच आता समोरसमोरील बैठकीची गरज नाही, असंही उत्तर कोरियाने यावेळेस सांगितलं होतं.

दक्षिण कोरियातून फुगे पाठवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उत्तर कोरियाने अनेकदा दक्षिण कोरियाकडे विनंती केली. मात्र हे फुगे येण्याचे प्रमाण काही कमी झालं नाही. तसेच हे प्रकार थांबवण्यासाठी उत्तर कोरियानं अनेकदा सीमाभागामध्ये पोलिसांद्वारे कारवाई केली आहे. या फुगे उडवणाऱ्यांवर बंदी घालावी ही उत्तर कोरियाची मागणी मात्र शेजारी देशाने अनेकदा फेटाळली आहे. त्यामुळेच संपातलेल्या उत्तर कोरियाने हा प्रकार म्हणजे आपल्या सरकारवरील हल्ला आहे असं जूनमध्ये जाहीर केलं होतं.