परस्परांचे शेजारी आणि पक्के वैरी असणारे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांदरम्यान होणारी उच्चस्तरीय बैठक उत्तर कोरियाने रद्द केल्याचे वृत्त आहे. यामागे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये होणाऱ्या ‘मॅक्स थंडर’ या दोन्ही देशांच्या हवाई दलाचा संयुक्त लष्करी सराव कारणीभूत मानले जात आहे.

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे यांच्यात गेल्या महिन्यांत झालेल्या बैठकीतील चर्चा पुढे नेण्यासाठी नवी बैठक होणार होती. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात होणारी बहुप्रतिक्षित शिखर बैठक रद्द करण्याची धमकीही उत्तर कोरियाने दिली आहे. दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहाप ने ही माहिती दिली आहे. दरम्यान, ट्रम्प आणि जोंग यांच्यात येत्या १२ जून रोजी सिंगापूर येथे बैठक होणार आहे.

तर दुसरीकडे ही बैठक रद्द करण्याच्या धमकीदरम्यान अमेरिकेने म्हटले आहे की, आम्ही शिखर बैठकीची तयारी करीत आहोत. दोन्ही देशांमध्ये ही बैठक यशस्वी होईल, अशी आशा अमेरिकेने वर्तवली आहे.