मागच्या काही काळापासून कोरियन सीमेवर शांतता होती. पण आता पुन्हा एकदा उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनच्या बहिणीने थेट युद्धाची धमकी दिली आहे. “दक्षिण कोरियाबरोबर संबंध तोडण्याची हीच योग्य वेळ आहे. शत्रूविरोधात पुढील कारवाई आता लष्कराकडून होईल” असे किम यो जोंगने म्हटले आहे. ब्लूमबर्गने हे वृत्त दिले आहे.

पत्रकाद्वारे दक्षिण कोरियाचा निषेध करण्याऐवजी प्रत्युत्तराची कारवाई करायला हवी. कारण पत्रकांचा एक तर गैरअर्थ काढला जाऊ शकतो किंवा मग त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, असं विधान किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंगने केल्याचे उत्तर कोरियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

“आपल्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन मी, सैन्याला शत्रूविरोधात पुढील कारवाई करण्याचे निर्देश देते” असे किम यो जोंगने म्हटले आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाई आज आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांची भेट घेऊ शकतात. कोरियन द्विपकल्पातील स्थितीबद्दल काल त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन बैठक पार पडली.

किम जोंग उन यांच्या बहिणीनं दक्षिण कोरियाच्या सीमेवरुन सोडण्यात येणाऱ्या फुग्यांवरून यापूर्वी दक्षिण कोरियाला सैन्य करार आणि इतर संबंध संपुष्टात आणण्याचा इशारा दिला होता. उत्तर कोरियामधील काही बंडखोर दक्षिण कोरियामधून फुगे सोडतात.  त्यात किम जोंग उन यांच्या हुकुमशाहीविरोधात संदेश लिहिलेले होते.