वाळूमाफियांनी जाळून मारलेले पत्रकार संदीप कोठारी यांच्या हत्येस जबाबदार असलेल्या आणखी सहा आरोपींना अटक करण्याची हमी मिळेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास कोठारी कुटुंबीयांनी नकार दिला आहे.
वध्र्याच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर संदीप कोठारी यांचा मृतदेह वर्धा जिल्ह्य़ातील सिंदी येथून सोमवारी सकाळी बालाघाट जिल्ह्य़ातील कटंगी या त्यांच्या गावी आणण्यात आला, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. ‘प्रसिद्ध आणि प्रभावी असलेल्या’ सहा आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या हत्येमागे असलेल्या सहा जणांना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतरच आम्ही मुलावर अंत्यसंस्कार करू, असे कोठारी यांचे शोकाकुल वडील प्रकाशचंद कोठारी व आई कांचन देवी म्हणाल्या.
संदीप कोठारी यांनी न्यायालयातील एक खटला मागे घेण्यास नकार दिल्यामुळे वाळूमाफियांशी घनिष्ठ संबंध असलेल्या तिघांनी त्यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे. या लोकांनी तीन दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या संदीपचा मृतदेह शनिवारी रात्री वर्धा जिल्ह्य़ातील सिंदी येथे रेल्वे रुळांजवळ आढळला. पोलिसांनी विशाल तांडी व ब्रजेश डहरवाल या दोन आरोपींना अटक केली असून, फरार असलेल्या राकेश नसवानी या तिसऱ्या आरोपीची माहिती देणाऱ्याला ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
तिन्ही आरोपी अवैध खाणकामात गुंतलेले होते, तसेच चिट फंड कंपन्या चालवत होते. जबलपूर येथील काही हिंदी दैनिकांचे तालुका वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या संदीप कोठारी यांनी काही लोकांविरुद्ध स्थानिक न्यायालयात दाखल केलेले अवैध खाणकामाचा खटला परत घेण्यासाठी ते त्यांच्यावर दबाव आणत होते. कोठारी यांनी खटला मागे घेण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी त्यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याचा पोलिसांचा कयास आहे.
आरोपी पूर्वी नागपूरजवळील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत काम करत असल्याने त्यांना या भागाची माहिती होती व त्यामुळेच त्यांनी या पत्रकाराचा मृतदेह फेकून देण्यासाठी सिंदीजवळील एका जागेची निवड केली, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसने पत्रकार कोठारी यांच्या खून प्रकरणाच्या तपासाकरिता तीन आमदारांची एक समिती स्थापन केली असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते सत्यदेव कटारे यांनी एका निवेदनात सांगितले.

पत्रकार संघटनेतर्फे निषेध
देशभरात पत्रकारांच्या हत्यांच्या वाढत्या घटनांचा आसाममधील पत्रकार संघटनेने निषेध केला असून, मृत पावलेल्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
उत्तर प्रदेशमधील शहाजहाँपूर येथील जगेंद्र सिंग यांना जाळून मारण्यात आल्यानंतर पत्रकाराच्या खुनाची देशातील यावर्षीची ही दुसरी घटना आहे. एकाच महिन्यात दोन सक्रिय पत्रकारांना आम्ही गमावले, हे धक्कादायक असल्याचे जर्नालिस्ट्स फोरम आसाम (जेएफए) या संघटनेचे अध्यक्ष रुपम बरुआ व सचिव नावा ठाकुरिया यांनी एका निवेदनात म्हटले आहे. पत्रकारांवरील हल्ल्यांच्या सर्व प्रकरणांत न्याय मिळवून दिला जावा, तसेच पत्रकारांना सुरक्षा निश्चित करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.