गुरमेहर कौरच्या वादाबद्दल बोलताना गृह राज्य मंत्री किरेन रिजिजू यांनी डाव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका केली आहे. आपल्या सीमेवर ज्या वेळी जवान हुतात्मा होतात तेव्हा डाव्या विचारसरणीचे लोक भारतात आनंदोत्सव साजरा करतात असे ते म्हणाले. भारत आणि चीन युद्धावेळी आपले जवान सीमेवर हुतात्मा होत होते आणि इथे भारतात हे लोक आनंद साजरा करत होते, अशी टीका रिजिजू यांनी केली आहे. गुरमेहर कौरची काही चुकी नाही असे ते म्हणाले. परंतु डाव्या विचारसरणीच्या संघटना मुलांच्या डोक्यात नको ते विचार पेरतात आणि त्यातून हे वाद निर्माण होतात असे ते म्हणाले. याआधी गुरमेहर बाबत बोलताना ते म्हणाले होते की तरुणांच्या मनामध्ये विष कोण कालवत आहे? त्यानंतर आज त्यांनी हे विधान केले आहे.

सोशल मिडियावर गुरमेहरने एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने असे लिहिले होते, की मी दिल्ली विद्यापीठात शिकते आणि मी अभाविपला घाबरत नाही. मी एकटी नसून माझ्यासोबत अनेक जण आहेत. सर्व देश माझ्याबाजूने आहे. अभाविप कार्यकर्ते हिसेंचा जो वापर करतात तो त्यांनी थांबवावा. हा केवळ एखाद्या व्यक्तीवर हल्ला नसून हा लोकशाहीवर हल्ला आहे असे तिने म्हटले होते. तिच्या या पोस्टनंतर तिच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला. तर काही जणांनी तिचे समर्थन देखील केले होते. त्यानंतर हा वाद चिघळला.

रॉबर्ट वढेरा, अरविंद केजरीवाल यांनी तिला समर्थन दिले आहे. तर, तिच्या मनात कोण विष कालवत असा प्रश्न गृह राज्य मंत्री किरेन रिजीजू यांनी उपस्थित केला होता. क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने देखील गुरमेहरच्या पोस्टची खिल्ली उडवणारी एक पोस्ट टाकली होती. त्यावर ही प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. या सर्व वादामुळे तिने दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. तसेच तिने ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए) च्या निषेध मोर्चामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला जे काही बोलायचे होते, जे काही सांगायचे होते ते आपण सांगितले आहे. कृपया आता मला एकटे राहू द्या असे म्हणत तिने या वादातून माघार घेतली.