भाजपच्या चंडीगढ खासदार किरण खेर कडाडल्या; मुलींनाही रात्री फिरण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट 

‘रात्री-अपरात्री मुलींच्या फिरण्यावर र्निबध का? र्निबध घालायचेच तर स्त्रियांवर अत्याचाराच्या समस्येला कारणीभूत असलेल्या मुलांना व पुरुषांनाच रात्री-अपरात्री फिरण्यावर का र्निबध घालत नाही? त्यांनाच घरात ठेवल्यास मुली अपरात्रीही निर्धास्तपणे फिरू शकतील,’ अशी तीव्र प्रतिक्रिया भाजपच्या चंडीगढच्या खासदार व प्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर यांनी बुधवारी दिली.

हरियाणातील आयएएस अधिकारी वीरेंदर कुंडू यांची मुलगी वर्णिकाच्या अपहरणाचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकासने केल्याच्या चंडीगढमधील घटनेचे सध्या तीव्र पडसाद उमटत आहेत. विकासची तळी उचलत असताना भाजपचे एक नेते रामवीर भट्टी यांनी वर्णिका अपरात्री रस्त्यावर काय करीत होती, असा सवाल केला होता. त्यावर खेर चांगल्याच कडाडल्या.

‘जर मुली दिवसा सुरक्षित आणि अपरात्री असुरक्षित असतील, तर अत्याचाराच्या समस्येचे कारण पुरुष आहेत. त्यांना रात्रीच काहीतरी होत असावे. त्यांच्यामुळे मुली व महिला असुरक्षित होत असतील तर त्यांनाच का बरे घरी ठेवत नाही?’ असा प्रतिसवाल त्यांनी केला.

वर्णिकाला आपला पूर्ण पाठिंबा आहे आणि याप्रकरणी दोषी असणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी ठणकाहून सांगितले. मात्र, वर्णिकाबरोबर त्या मुलाचीही (विकास) बाजू ऐकून घेण्यास हरकत नसल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान, भाजप युवा आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनीही महिलांवरील अत्याचार सहन करणार नसल्याचे सांगितले. आरोपी कोणीही असो, दोषी असेल तर शिक्षा नक्की होईल. फक्त प्राथमिक तपास पूर्ण होईपर्यंत आणि वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत घाईघाईने निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या.