डीडीसीए भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची माफी मागितली आहे. पण केजरीवालांनी माफी मागितल्यामुळे भाजपाने निलंबीत केलेले खासदार किर्ती आझाद चांगलेच नाराज झाले आहेत. केजरीवालांप्रमाणे आझाद यांनीही जेटलींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. केजरीवालांवर टीका करताना आझाद यांनी केजरीवाल भित्रे असल्याचंही म्हटलं. तसंच त्यांनी जेटलींना आव्हान देताना माझ्यावर मानहानीचा खटला दाखल करून दाखवा असं म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल भित्रे आहेत. पण मी जे आरोप केले होते त्यावर मी अजूनही ठाम आहे. डीडीसीएमध्ये 400 कोटींचा गैरप्रकार जेटली अध्यक्ष असतानाच झाला होता असा आरोप पुन्हा एकदा आझाद यांनी ट्विटरद्वारे जेटलींवर केला आहे.

दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) प्रकरणात केलेल्या आरोपांवरुन काल केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रक काढून जेटलींची माफी मागितली. केजरीवालांसह ‘आप’ नेते संजय सिंह, राघव चढ्ढा, आशुतोष या तिघांनीही जेटलींची माफी मागितली. जेटलींनी केजरीवालांविरोधात १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी माफी मागून हा खटला सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न केला. केजरीवाल यांच्या माफीनाम्यानंतर अरुण जेटली खटला मागे घेणार असून हे प्रकरण आता संपल्यात जमा आहे.