जम्मूतील किश्तवार जिल्ह्यात उसळलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारमधील गृहराज्यमंत्री सज्जाद अहमद किचलू यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. किचलू यांचा राजीनामा आपल्याला मिळाला असून, तो राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत किचलू यांना पदमुक्त करण्यात येत आहे. असे ट्विट मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.
किश्तवारमधील दंगलीवरून सोमवारी राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते अरूण जेटली यांनी अब्दुल्ला कुटुंबियांवर हल्लाबोल केला. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून, तो कोणत्या एका कुटुंबाची मालकी नाही, असे जेटली म्हणाले होते. जेटली यांच्या टीकेला अब्दुल्ला यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले. २००२ मध्ये गुजरातमध्ये भडकलेल्या दंगलींनतर तेथील गृहमंत्र्यांनी किवा गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता का किंवा राजीनामा देण्याती तयारी तरी दाखविली होती का, याची माहिती जेटली यांनी संसदेला द्यावी, असे ट्विट अब्दुल्ला यांनी केले.