‘शार्ली हेब्दो’ या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या पॅरिसमधील जुन्या कार्यालयाजवळ शुक्रवारी चाकू हल्ल्याची घटना घडली. यात दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला दोन हल्लेखोर आहेत असे वाटले. पण प्रत्यक्षात एकच हल्लेखोर होता. पूर्व पॅरिसमधील पोलीस ठाण्यात या संशयिताला नेण्यात आले आहे. पोलीस या भागात अजूनही शोध घेत आहेत.

ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी सुरु झाली आहे असे पॅरिसमधील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. चारजण जखमी झाल्याचे पोलिसांनी आधी जाहीर केले होते. पण नंतर फक्त दोनच जण या हल्ल्यात जखमी झाल्याचे असोसिएटेड प्रेसला सांगण्यात आले. शुक्रवारचा हल्ला कुठल्या उद्देशाने झाला किंवा त्याचा ‘शार्ली हेब्दो’शी  काही संबंध आहे का ? ते अजून स्पष्ट झालेले नाही.

२०१५ साली ‘शार्ली हेब्दो’च्या कार्यालयावर हल्ला झाला होता. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ‘शार्ली हेब्दो’चे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. यापूर्वी ‘शार्ली ऐब्दो’मध्ये प्रसिद्ध झालेल्या काही व्यंगचित्रांवरुन वाद झाले आहेत.