जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलाच्या चकमकीत मारला गेलेला लष्कर – ए-तोयबाचा कमांडर अबू दुजाना याचं नाव ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांच्या यादीत होतं. ‘लष्कर’च्या ए प्लस प्लसच्या यादीत त्याचं नाव होतं. त्याच्यावर १० लाखांचं बक्षिसही जाहीर झालं होतं. अनेक अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असलेला दुजाना विकृत होता, अशी माहिती समोर आली आहे. तो वासनांध होता. वासनांध दुजाना कुणाच्याही घरात घुसायचा. काश्मिरी मुलींना त्याच्यापासून धोका होता, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

दुजाना अनेकदा सुरक्षा दलांच्या हातून निसटला होता. तब्बल पाच वेळा त्यानं सुरक्षा दलाच्या जवानांच्या हातावर तुरी दिल्या होत्या. अखेर मंगळवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला घेरलं. त्यामुळं तो पळून जाऊ शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तो आपल्या पत्नीच्या भेटीसाठी गावात आला होता. तो येणार असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळालीच होती. त्यानुसार जवानांनी सापळा रचला. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या वेळी चकमकीदरम्यान दुजानाचा आयफोन घटनास्थळावरून मिळाला होता. त्याच्या आधारे सुरक्षा दलाला त्याच्या हालचालींची माहिती मिळत होती. याआधी त्याला दोनदा या गावात पाहिलं होतं. त्याच्या येण्याच्या निश्चित वेळेची माहिती घेतली होती. मंगळवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील हकडीपोरा गावात त्याला घेरलं. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान साध्या वेशात तिथे पोहोचले. दोन तासांनी अतिरिक्त फौजफाटाही तेथे पोहोचला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. पोलिसांना लष्कराच्या १८२ बटालियन, १८३ बटालियन, ५५ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफचंही सहकार्य मिळालं. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास मोहीम सुरू केली. दोन्ही दहशतवादी एका घरात लपल्याचे स्पष्ट झाले. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण ते बाहेर न आल्यानं अखेर सुरक्षा दलाच्या जवानांनी स्फोटकांनी घर उडवून दिले. त्यात दुजाना मारला गेला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.