पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीबद्दल मागच्या काही दिवसांपासून अनेक गोष्टी आपल्या कानावर पडत आहेत. त्याने केलेल्या घोटाळ्याबाबतच्या या गोष्टी आणि त्यामुळे तो परदेशात असणे हे माहित आहे. पण त्याचे शिक्षण आणि वैयक्तिक जीवन याबाबतच्या अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतील. पाहूयात काय आहेत या संदर्भातील तथ्य…

१. नीरव मोदी याचे शिक्षण बेल्जियममध्ये झाले आहे. अभ्यासात तो कायमच बऱ्यापैकी मागे असायचा.

२. नीरवने महाविद्यालयीन शिक्षण वॉर्टन महाविद्यालयातून घेतले आहे. या महाविद्यालयात अनेक अरबपतींनी शिक्षण घेतले आहे. फायनान्स विषयात स्पेशलायझेशन केले आहे.

३. त्याने आपले शिक्षण पूर्ण केले नसून ते मधेच सोडून दिल्याचेही अनेक जण बोलतात. हे शिक्षण सोडून तो पुन्हा भारतात आला.

४. त्यानंतर त्याने आपल्या काकांकडून डायमंड ट्रेडचे प्रशिक्षण घेतले आणि त्यात तो पारंगतही झाला.

५. हे काम शिकल्यानंतर त्याने आपला फायरस्टार हा ब्रँड लाँच केला आणि दिल्ली, मुंबई, न्यूयॉर्क आणि हाँग-काँग, लंडन आणि मकाऊ याठिकाणी आपली दुकाने सुरु केली.

६. नीरव मोदी श्रीमंत लोकांपैकी एक असून तो सध्या भारतातील श्रीमंतांपैकी ८५ व्या स्थानावर आहे. त्याची संपत्ती आता १.८ बिलियन डॉलर इतकी आहे.

७. काही रिपोर्टसनुसार, नीरव याला सुरुवातीपासून कला आणि डिझाईन यामध्ये आवड होती. या आवडीमुळे तो लंडनमधील वेगवेगळ्या म्युझियममध्ये जायचा.

८. नीरवने डिझाईन केलेले दागिने केट विन्स्लेट, नाओमी वॉटस, कोको रोशा, लिसा हेडन आणि ऐश्वर्या राय यांच्यासारख्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टाईल आयकॉन घालतात. त्यामुळे त्याच्या दागिन्यांना विशेष महत्त्व आहे.