पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजातील अनियमितता आणि सरन्याधीश दीपक मिश्रा यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले. सुप्रीम कोर्टाचे  वरिष्ठ न्यायाधीश चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि खळबळ उडवून दिली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेतली आहे. आपण या बातमीच्या आधारे जाणून घेऊया,

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करणारे हे चौघे आहेत तरी कोण?

१) जस्टिस चेलमेश्वर : जस्टिस चेलमेश्वर १९९७ मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टाचे जज म्हणून नियुक्त झाले. २००७ मध्ये त्यांना गुवाहाटी हाय कोर्टाचे चीफ जस्टिस म्हणून नियुक्त करण्यात आले. तर २०१० मध्ये ते केरळ हायकोर्टाचे चीफ जस्टिस झाले. त्यानंतर २० ऑक्टोबर २०११ पासून त्यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. चेलमेश्वर हे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत.

२) जस्टिस रंजन गोगोई : जस्टिस रंजन गोगोई यांनी त्यांची बहुतांश कारकीर्द गुवाहाटी येथील कोर्टात गाजवली आहे. २००१ मध्ये त्यांना गुवाहाटी हायकोर्टाचे जज म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१० मध्ये रंजन गोगोई यांना पंजाब आणि हरयाणा हाय कोर्टात नियुक्त करण्यात आले. २३ एप्रिल २०१२ पासून गोगोई सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.

३) जस्टिस मदन भीमराव लोकूर : मदन लोकूर यांनी गुवाहाटी आणि आंध्र प्रदेश हायकोर्टात सरन्यायाधीश म्हणून काम केले आहे. तर ४ जून २०१२ रोजी त्यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश म्हणून करण्यात आली.

४) जस्टिस कुरियन जोसेफ : केरळ हायकोर्टात कुरियन जोसेफ यांनी दोनवेळा सरन्यायाधीश म्हणून काम केले आहे. २०१३ मध्ये त्यांना हिमाचाल प्रदेश हाय कोर्टात सरन्यायाधीश म्हणून नेमण्यात आले. तर ८ मार्च २०१३ ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी ते निवृत्त होतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहीले होते. या चौघांपेक्षा कनिष्ठ असलेल्या न्यायाधीशांकडे महत्त्वाचे खटले दिले जात होते, याबाबत चौघांनीही नाराजी व्यक्त केली होती, असे सांगितले जाते.