भारतातील शेतकरी आंदोलनावर परदेशातील सेलिब्रेटिंनी प्रतिक्रिया देत पाठिंबा दर्शवल्यानंतर त्याविरोधात भारतातील सेलिब्रेटिंनी भारत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. यावर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी भारतातील सेलिब्रेटिंना आधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि त्यानंतर आपल्या भूमिका मांडा असा सल्ला दिला आहे.

राऊत म्हणाले, “सेलिब्रेटींवरती देशाचं आंदोलन चालत नाही. थंडी, पावसासारख्या परिस्थितीत शेतकरी आंदोलनासाठी गाझीपूर सीमेवर बसले आहेत. त्यांच्याबद्दल या सेलिब्रेटिंनी संवेदना व्यक्त केली आहे का? भारतातील जे सेलिब्रेटी ट्विटरवरुन आज बोलत आहेत त्यांना भाजपाने एका लक्झरी बसमध्ये बसवून गाझीपूर, सिंघू बॉर्डरवर नेलं पाहिजे आणि हजारो शेतकरी कोणत्या परिस्थितीत तीन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, राहत आहेत, हे दाखवायलं पाहिजे.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलनाच्या आंतरराष्ट्रीय चर्चेमुळं भारताच्या प्रतिमेला तडा जाणार नाही – संजय राऊत

काही मोजके सेलिब्रेटी सोडले तर यातील एका तरी सेलिब्रेटी शेतकऱ्याच्या बाजूनं उभा राहिला आहे का? आधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि मग आपल्या काय भूमिका मांडायच्या आहेत त्या मांडा. जगभरातील लोकांचाही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. पण देशातील काही प्रमुख लोक त्यांना पाठिंबा द्यायला तयार नाहीत, कारण ते भीती आणि दहशतीखाली आहेत, असंही राऊत यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- रिहानाच्या पाठिंब्यानंतर क्रिकेटपटूंची ‘बॅटिंग’! सचिनपासून शास्त्री गुरूजींपर्यंत; अजिंक्य-विराटनेही दिली प्रतिक्रिया

“काल मी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली, हे आंदोलन आता पसरत चाललं आहे. स्वतःला सेलिब्रेटी समजणाऱ्यांना सेलिब्रेटी कुणी केलं? त्यांना राज्यकर्त्यांनी किंवा राजकारण्यांनी सेलिब्रेटी केलेलं नाही, तर सामान्य, मध्यमवर्गीय माणसानं, कष्टकऱ्यानं, शेतकऱ्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं, सेलिब्रेटी केलं. त्यामुळे तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या,” असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.