राजकारण्यांकडून करण्यात येणारे दावे हे आपल्यासाठी काही नवे नाही. चर्चेत राहण्यासाठी अनेकदा राजकारणी काही ना काही दावे करतच असतात. अशातच सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला मध्यस्थी करण्याची विनंती केली होती, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तर सत्ताधाऱ्यांनी ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचे सांगत तो फेटाळून लावला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील सभागृहात स्पष्टीकरण देत काश्मीर प्रकरणी कोणत्याही तिसऱ्या पक्षाची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. ट्रम्प यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचा दावा केला नाही. त्यांनी आतापर्यंत जवळपास साडेदहा हजार खोटे दावे केल्याचे वृत्त समोर आले आहे.

869 दिवसांमध्ये ट्रम्प यांनी 10 हजार 796 खोटे दावे केले आहेत. वॉशिंग्टन पोस्टने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या दाव्यांबाबत फॅक्ट चेक केले आणि त्यानंतर त्यांच्या दाव्यांमधील बहुतांश दावे हे खोटे असल्याचे समोर आले आहे. वॉशिंग्टन पोस्टने 10 जून रोजी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. 7 जून पर्यंत म्हणजे राष्ट्राध्यक्षपदाच्या 869 दिवसांच्या कार्यकाळापर्यंत ट्रम्प यांनी 10 हजार 796 खोटे दावे केल्याचे त्यात नमूद केले आहे. कार्यभार साभाळल्यानंतर ते दररोज सरासरी 12 खोटे दावे करत असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

त्यांच्या खोट्या दाव्यांमधून जर्मनीचीही सुटका झालेली नाही. नाटोच्या मुद्द्यावरही त्यांनी खोटा दावा केला होता. जर्मनी नाटोला आपल्या हिस्सेदारीतील 1 टक्का हिस्सा देतो. त्यांनी जास्त हिस्सा दिला पाहिजे. आम्ही जर्मनीचे संरक्षण करतो आणि तेव्हाच जर्मनी आमच्याकडून ट्रेड फायदा घेतो, असे ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर वॉशिंग्टन पोस्टने केलेल्या फॅक्ट चेकनुसार त्यांनी आपल्या वक्तव्यात सुधारणा केली नसल्याचे समोर आले होते. नाटोमध्ये डायरेक्ट आणि इनडारेक्ट अशा दोन्ही प्रकारे फंडिंग होत असते. सदस्य देशांच्या नॅशनल ग्रॉस इन्कमच्या आधारावर अशी फंडिंग अवलंबून असते. नाटोमध्ये अमेरिका 22 टक्के तर जर्मनी 15 टक्के हिस्सा देत असतो. तर इनडायरेक्ट फंड अंतर्गत देशाचा संरक्षण क्षेत्रातील खर्च हा त्याच्या जीडीपीच्या तुलनेत किती आहे हे पाहिले जाते.

दरम्यान, ट्रम्प यांच्या काश्मीर प्रश्नावरील दाव्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सभागृहात स्पष्टीकरण देत ट्रम्प यांचा दावा फेटाळला होता. तसेच काश्मीरप्रश्नी कोणत्याही तिसऱ्या पक्षाची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट केले होते.