लोकसभेत गुरुवारी पुन्हा एकदा ब्रिटनकडून कोहिनूर हिरा परत आणण्याची जोरदार मागणी करण्यात आली. बीजेडीच्या सदस्याने केलेल्या या मागणीला अकाली दलाच्या सदस्यांसह अनेक सदस्यांनी त्वरित जोरदार पाठिंबा दिला.
सभागृहात शून्य प्रहराला हा प्रश्न उपस्थित करताना भर्तृहरी माहताब यांनी, कोहिनूर हिरा ब्रिटनला भेट दिल्याचे वृत्त फेटाळले. महाराजा रणजितसिंग यांचा पुत्र दुलीपसिंग यांच्याकडून ब्रिटिशांनी सदर हिरा जबरदस्तीने घेतल्याचे ते
म्हणाले.
लाहोरमध्ये वास्तव्याला असलेल्या ब्रिटिशांच्या राजकीय हस्तकाने गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांना पत्र लिहिले होते त्यामध्ये १८४९ च्या युद्धानंतर सदर हिरा ब्रिटिशांच्या ताब्यात कसा गेला त्याचे वर्णन करण्यात आले आहे, असे माहताब म्हणाले.
कोहिनूर हिरा ही भारताची प्रतिष्ठा आहे, ज्या पद्धतीने तो इंग्लंडच्या राणीकडे गेला ती कृती फसवणुकीची, जबरदस्तीने शरणागती पत्करणारी होती. सुवर्णमंदिर आणि काशिविश्वनाथ मंदिराला ज्याप्रमाणे भेटवस्तू देण्यात आल्या त्याप्रमाणेच महाराजा रणजितसिंग यांना सदर हिरा पुरीच्या मंदिराला भेट द्यावयाचा होता, असेही माहताब म्हणाले.
ब्रिटनने सर्व वस्तू परत केल्यास तिजोरी रिक्त होईल, असे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी म्हटले असले तरी भारताने हा हिरा परत मिळविण्यासाठी ब्रिटनवर दबाव टाकावा.

‘भारताने कणखरपणे पाकिस्तानशी चर्चा करावी’
काँग्रेसने गुरुवारी लोकसभेत पठाणकोट हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. या विषयावर पाकिस्तानशी कणखर भूमिकेतून चर्चा करावी, भावनिक होऊ नये, असा सल्ला काँग्रेसने सरकारला दिला. सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होण्यापूर्वी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांना सदर प्रश्न उपस्थित करण्याची अनुमती दिली. मात्र या प्रश्नाला राजकीय रंग न देण्याची सूचनाही त्यांनी शिंदे यांना केली. सत्ताधारी सदस्यांनी याला विरोध केला असता शिंदे म्हणाले की, पाकिस्तानचे संयुक्त तपास पथक भारताच्या दौऱ्यावर आले होते त्यामध्ये आयएसआयचा एक सदस्य होता.