कोहिनूर हिरा भारताची संपत्ती असला तरी तो ब्रिटनकडून परत मिळवता येणार नाही, अशा शब्दांत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टापुढे हतबलता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांमुळे भारताचे हात बांधले गेले आहेत. त्यामुळे ब्रिटनमधून कोहिनूर परत आणण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसल्याचे सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने मंगळवारी यांसंबंधीचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. कोहिनूर भारतात परत आणण्याचे जवळपास सर्व मार्ग खुंटले असले तरी याविषयी सामोपचाराने किंवा ब्रिटनशी एखादा करार करून मार्ग काढता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही केंद्राने यावेळी सांगितले. कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीला भेट देण्यात आला होता, याचे कोणतेही अधिकृत आणि ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, कोहिनूरशी भारतीय जनतेच्या असलेला भावनिक बंधाची आम्हाला जाण आहे, असे या प्रतित्रापत्रात म्हटले आहे.
भारत आणि ब्रिटनमध्ये असलेल्या पुरातन आणि कलात्मक वस्तूंसंबंधीच्या कायद्याच्या तरतूदीही १९७२ याप्रकरणात अंमलात आणता येऊ शकत नाही. हा कायदा अंमलात आणण्यापूर्वीच संबंधित वस्तू  दुसऱ्या देशात गेली असल्यास या कायद्याच्या अटी लागू करता येत नाहीत. याशिवाय, युनेस्कोकडूनही याप्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देण्यात आला आहे. हिरा ब्रिटनला दिल्यानंतर बराच काळानंतर दोन्ही देशांतील करार अस्तित्वात आल्याने याबाबतीत हस्तक्षेप करणे शक्य नसल्याचे युनेस्कोने म्हटले आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गांपेक्षा शिष्टाईच्या मार्गाने प्रयत्न करण्यावर भारताकडून भर देण्यात येणार आहे.
इंग्लंडकडून काही दिवसांपूर्वीच कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे कोहिनूर भारतात परत आणण्याच्या आशा आणखी धुसर झाल्या होत्या. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी सांगितले. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया कंपनी घेऊन गेली हे म्हणणे खरे नसून, शीख राजे महाराज रणजितसिंग यांनी तो ब्रिटनला भेट दिला होता, असे सांगत केंद्र सरकारने यापूर्वीही असमर्थता व्यक्त केली होती.  इंग्रज व शीख यांच्यात झालेल्या युद्धात ब्रिटनने तत्कालीन अविभाजित पंजाबमधील शीख साम्राज्यावर ताबा मिळवला होता. त्यानंतर १८५० साली १०८ कॅरटचा हा हिरा तत्कालीन ब्रिटिश सम्राज्ञी महाराणी व्हिक्टोरिया यांना भेट म्हणून देण्यात आला होता.